यंदा वारी प्रथमच फक्त ऑनलाइन झाली. कोरोनाच्या भीतीमुळे शहरे चिडीचूप होती, रस्ते निर्मनुष्य होते. शहाणीसुरती माणसे स्वतःला कोंडून घेऊन बसली होती. स्वतःला शहाणे मानणारी माणसे चेहऱयावर मास्क लावून किंवा न लावता रस्त्यावर वावरत होती. दरवषी शहरोशहरी चौकाचौकात उभारल्या जाणाऱया स्वागताच्या कमानी, पुढाऱयांच्या फोटोंचे फ्लेक्स, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे सुसज्जीकरण, वारकऱयांना अन्नदान, पादत्राणे, छत्र्या, रेनकोट वगैरेंचे वाटप, त्याच्या वृत्तपत्रातल्या बातम्या, रस्तोरस्ती पार्क केलेले दिंडय़ांचे ट्रक्स, सार्वजनिक बागांजवळ उभारलेली तात्पुरती मोबाईल स्वच्छतागृहे वगैरे सर्वच गोष्टी राहून गेल्या. त्या गोष्टींमधूनचे तात्पुरते आणि तुटपुंजे अर्थकारण बंद पडले.
वारीच्या काळात शहरातून हिंडताना वारकऱयांचे जथ्थे इकडून तिकडे जाताना दिसत. त्यांच्या चालण्याची एक विशिष्ट शैली असते. झपाझप पावले उचलत असतात. तोंडात सतत कुठले तरी अभंग किंवा मग नुसते नामस्मरण. त्याला देखील एक लय असते. श्रद्धेचा हात सुटला असला तरी या साऱयाने हळवे होणे, नोस्ताल्जिक होणे सरलेले नाही.
दरवषी वारीला जाणारी आजी खूपच थकली तेव्हा वारीच्या काळात फक्त पालख्यांचे मुक्काम असत त्या निवडुंग्या विठोबाच्या देवळात जायची. तिच्या ओळखीतल्या म्हाताऱयांना भेटायची. अश्रद्ध मी तिचा हात धरून तिला देवळात न्यायचो आणि नंतर घरी आणायचो. आजीला जाऊन खूप वर्षे झाली. दर वषी आठवणारे ते याही वषी आठवले. दर वषी पालखी मार्गस्थ व्हायची त्या पहाटेची आठवण यंदा तीव्रतेने झाली. रात्री कितीही उशिरापर्यंत जागे असलो तरी त्या पहाटे मात्र उजाडायच्या आतच वारकऱयांच्या गजबजीने जाग यायची. टाळांचे आवाज, नामाचे गजर, शब्द नीट ऐकू न येणारे कोरसमधले अभंग आणि हळूहळू एकेक जथ्था पुढे जात वळणावर अदृश्य होणे. वारी निघून गेली की सारे शहर वधूवरांसह वऱहाडी निघून गेल्यावर रिकाम्या झालेल्या मांडवांप्रमाणे ओकेबोके भासते. वारी निघून गेल्यावर हमखास दिसणारे एक दृष्य म्हणजे वारीच्या उलट दिशेने गावाकडे जाणारे जथ्थे. यांचेही पोषाख वारकऱयांसारखे असतात. पण हे गवशे लोक. वारीमध्ये शिरून कुठे चार घास खायला मिळवणारे लोक. रस्त्यावरच्या कोणालाही अडवून हे उसने पैसे मागतात. तीन आकडी रकमेपासून कटिंग चहापुरते पाच रुपये, कितीही… यांचा राग येतो, दया येते, आपल्या अर्थव्यवस्थेची लाजही वाटते. काय करणार.








