सुनेच्या खूनप्रकरणी होता अटकेत
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा कारागृहातील एका कच्च्या कैद्याचा शनिवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रामचंद्र तिप्पाण्णा बेविनकट्टी (वय 65) रा. हिडकल डॅम, ता. हुक्केरी असे त्याचे नाव आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला 23 जुलै रोजी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांचा उपयोग न होता शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.
हुंड्यासाठी सुनेचा खून केल्याच्या आरोपावरून रामचंद्र व त्याच्या कुटुंबीयांवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात 6 जून 2023 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी अटक करून तिघा जणांना हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे या वृद्धाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शवचिकित्सा अहवालानंतरच निश्चित कारण समजू शकणार आहे.









