प्रतिनिधी / कारवार
येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात कुटुंबनियोजन शस्त्रचिकित्सेवेळी संशयास्पद मृत झालेल्या गीता बानावळी या महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हाती घेण्यात आलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाने रविवारी सातव्या दिवसात प्रवेश केला. त्या महिलेचा मृत्यू 3 सप्टेंबर 2020 रोजी झाला होता. दरम्यान बेमुदत उपोषणाला दिवसागणिक पाठिंबा वाढतच आहे. दलित संघर्ष समितीचे राज्य संचालक दीपक कुडाळकर कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांनी यापूर्वीच आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आहे. रविवारी अंकोला तालुक्यातील कणगल येथील हरिकंत्र, समाजातील राजू हरिकंत्र (मच्छीमारी सहकारी संघाचे अध्यक्ष), राम हरिकंत्र, रवी हरिकंत्र, कृष्णा हरिकंत्र, निर्मला हरिकंत्र, सुमित्रा हरिकंत्र, प्रेमा हरिकंत्र, सविता हरिकंत्र आदींनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाला पाठिबा दिला.
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
दरम्यान किम्समधील डॉक्टरांच्या विरोधात आणि मयत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बेमुदत उपोषण आंदोलन हाती घेऊन सात दिवस लोटले तरी जिल्हा प्रशासनाने किंवा अन्य संबंधिताना या आंदोलनाची अद्याप दखल घेतलेली नाही.









