कराड महामार्ग केंद्राचे हवालदार मधुकर पवार यांनी स्पीडगनची कमाल
प्रतिनिधी/ कराड
कायदा प्रत्येकाला समान असतो असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षांत तसे होताना दिसत नाही. मात्र महामार्गावर तैनात हवालदार मधूकर पवार यांच्या हातातील स्पिडगनने ती कमाल करून दाखवली. त्यामुळे महामार्ग पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल 1 हजार दंड झाला.
त्याचं झालं असं, येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रातर्फे मालखेड फाटा येथे इंटरसेप्टर व्हेईकलमधील स्पीडगनच्या सहाय्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱया वाहनांवर केसेस करण्याचे काम चालू होते. त्यावेळी हवालदार मधुकर पवार यांनी, महामार्गावरून निघालेले पुणे महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या गाडीने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने त्या गाडीवर कारवाई केली. पवार यांनी केलेल्या या कारवाईचे स्वत: मिलिंद मोहिते यांनी दंड भरून कौतुक केले.
कराड महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या ताफ्यात नव्याने इंटरसेप्टर व्हेईकलमधील स्पीडगनच्या दाखल झाली आहे. त्याच्या साहाय्याने 29 जानेवारी रोजी कराड महामार्ग पोलीस मालखेड फाटा येथे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱया वाहनांवर केसेस करत होते. त्यावेळी महामार्ग पोलीस केंद्र उजळाईवाडी (जि. कोल्हापूर) येथे वार्षिक तपासणीकामी पुणे पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते हे निघाले होते. त्यांच्या गाडीने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने हवालदार मधुकर पवार यांनी त्यांच्या गाडीवर केस केली. उजळाईवाडी येथील तपासणीनंतर पोलीस अधीक्षक मोहिते हे कराड येथे आल्यानंतर त्यांना याबाबत कल्पना दिली. मोहिते यांनी दंडाच्या रकमेबाबत विचारणा करून ताबडतोब गाडीवरील चालकास 1 हजार रूपये दंड भरण्यास सांगितले. तसेच शासकीय गाडीवर कारवाई केल्याबद्दल पोलीस हवालदार पवार यांचे कौतुक करून 500 रूपये बक्षीस देण्यात आले.









