लांजा शहरातील कुकुटपालन येथे अपघात
प्रतिनिधी/ लांजा
भरधाव इको कारने समोरून येणाऱया स्प्लेंडर दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरातील कुकुटपालन येथे ही दुर्घटना घडली. विरुद्ध दिशेला जात कारने दिलेली धडक इतकी जबर होती की दुचाकीचालक तीस फुट अंतरावर जाऊन जमिनीवर आदळला.
या अपघातात विकास महादेव राब (38, रा. देवधे मणचेकरवाडी, ता. लांजा) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास राब दुचाकीवरून (एमएच क्र. 08 एक्स-5263) लांजा शहरामध्ये आला होता. दुपारी 12.30 च्या सुमारास देवधे येथील घरी निघाला होता. शहरातील कुकुटपालन येथे आला असता रत्नागिरीकडून लांजाच्या दिशेने भरधाव जाणाऱया मारुती इको कारने (एमएच 02 बीटी 3813) विरुद्ध दिशेला जात स्प्लेंडरला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की स्प्लेंडरवरील विकास राब हा सुमारे तीस फूट अंतरावर फेकला गेला. यात विकासचा उजवा पाय पुर्णतः तुटून पडला होता. तर दुचाकीचे पुढील चाक व स्टेअरींगही तुटले. यात कारगच्या पुढील बाजूचेही मोठे नुकसान झाले आहे. ही कार आदित्य सुनिल पाटील (21, रा. लांजा सार्दळवाडी) चालवत होता.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. विकास याचा मृतदेह लांजा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विकास कर्तबगार बांधकाम व्यवसायीक होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.









