बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई : दिवाळीच्या सुटीत झाली होती चोरी, 4 लाख 80 हजार रुपयांचे ब्रास बार जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
ऐन दिवाळीत नावगेजवळील एका कारखान्यातून ब्रास बारची चोरी केल्याच्या आरोपावरून बुधवारी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी नावगे येथील पाच तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 4 लाख 80 हजार रुपये किमतीचे ब्रास बार जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. ए. चौगुला, एम. टी. कोटबागी, वाय. वाय. तळेवाड, पी. एस. पवार, एस. एम. सिंदगी आदींनी ही कारवाई केली आहे.
नावगेजवळील हायड्रोमॅटिक कारखान्याला दिवाळीनिमित्त आठवडाभर सुटी देण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी मोठय़ा प्रमाणात ब्रास बार पळविले होते. या कारखान्यात तयार होणारे ब्रास बार निर्यात केले जातात. 2 ते 8 नोव्हेंबरपर्यंत सुटी होती. याकाळात रखवालदार असूनही ही घटना घडली होती.
11 नोव्हेंबर रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात चोरी प्रकरणाची नोंद झाली होती. पोलिसांनी नावगे येथील पाच जणांना याप्रकरणी अटक केली आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे टाटा-एस वाहनही जप्त केले आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.









