युवराज निकम / इस्लामपूर
कार्पोरेट दर्जाच्या नवीन तहसील कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. दरम्यान ठाकरे यांच्यासह जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या इमारतीतून कारभार ही पारदर्शी आणि लोकांची अडवणूक न होता, व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षातील वाळवा महसूल विभागाचा कामाचा आलेख खालावला आहे. सातबारा संगणकीकरणात बराच वेळ गेल्याने लोकांना मोठा त्रास सोसावा लागला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांचा आदरयुक्त दबदबा नसल्याने गाव चावडीपर्यंतचा कारभार बिघडला आहे. ही घडी सुरळीत करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्यासमोर राहणार आहे.
सन 2013 ला ना.पाटील यांनी पुर्वीच्या जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवरच नव्याने टोलेजंग इमारत बांधण्याचे नियोजन केले. त्यासाठी आर्थिक तरतूद केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले. पण त्या दरम्यानच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. पण त्याकाळात लोकांना केवळ इमारतीचे बांधकामच सुरु असल्याचे पहावे लागले. माजी कृषीराज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत यांचा आपल्या कार्यकाळात या इमारतीचे उदघाटन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही संधी हुकली. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येताच ना.पाटील यांनी गेल्या 15 दिवसांत उर्वरित कामे करुन उदघाटनाची संधी साधली.
सुमारे 14 कोटी रुपयांची ही इमारत सुसज्ज अशी झाली आहे. या इमारतीत सर्व सेवा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पेठ-सांगली रस्त्यावरील प्रशासकीय इमारतीचा धडा घेवून येथे उदघाटनावेळीच लिफ्ट बसवण्यात आली आहे. पार्किंग, सौरऊर्जा, पुरुष व महिला स्वच्छतागृहे यांसह बहुतेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे व ना.पाटील यांनी इमारतीची डागडूजी ठेवण्याबरोबरच खुर्च्याही व्यवस्थित सांभाळा, असा मार्मिक टोला लगावला. गेल्या दोन वर्षातील वाळवा महसूलमधील काही अधिकाऱयांचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. हे अधिकारी काम कमी आणि उचापतीत अधिक व्यस्त राहिल्याने सामान्य लोकांना कामे करुन घेताना त्रास सहन करावा लागला आहे.
या अधिकाऱयांवर वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा वचक राहिलेला नाही. आणि त्या अधिकाऱयांचा कार्यालयीन कर्मचारी व तलाठी, मंडलाधिकारी यांच्यावर कसलाच अंकुश राहिला नाही. त्यामुळे वाळवा महसूल विभागाची जिल्हाभर किंबहूना राज्यभर बेअब्रू झाली. अधिकारी व कर्मचाऱयांत समन्वय नसल्याने कामांची पेंडन्सी मोठया प्रमाणात आहे. अनेक दावे क्रमवारीने न घेतल्याने सामान्य खातेदारांवर अन्याय झाला आहे. त्याबाबत वकील संघटनेचीही तक्रार आहे. प्रांत व तहसील कार्यालयात अनेक टेबलवर काही कर्मचारी तळ मारुन बसले आहेत. तर काहीजण कामा पेक्षा अधिकाऱयांची हुजरेगिरी करीत राहिल्याने संबंधीत अधिकाऱयांची कामाची दिशा भरकटल्याचे चित्र आहे.
नवीन तहसील कार्यालयाच्या शुभारंभाने या परिसरातील व्यापारी व व्यावसायीकांत ‘फिलगुड’ आहे. या कार्यालयामुळे गेल्या पाच-सहा वर्षापासून बसलेले धंदे उभारी घेणार आहेत. पण काही प्रमाणात प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय वेगवेगळया ठिकाणी राहणार असल्याने लेकांची गैरसोय होणार आहे. पेठ-सांगली रस्त्यावरील प्रशासकीय इमारत गैर कारभाराबरोबच अस्वच्छतेने ग्रासली आहे. या इमारतीची डागडूजी करुन त्याठिकाणी ही लिफ्ट बसवणे आवश्यक आहे.








