केंद्र सरकार कामगारविरोधी असल्याचा आरोप
बेळगाव / प्रतिनिधी
किमान वेतन, आठ तास काम, जीएसटी कमी करावा, खासगीकरण थांबवावे, ऑनलाईन खरेदी-विक्रीवर बंदी घालावी यासह इतर मागण्यांसाठी विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. यावेळी तीव्र घोषणाबाजी देऊन कामगारविरोधी सरकार म्हणून आरोप करत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
धर्मवीर संभाजी चौक येथून सीटू, आयटक आणि इतर संघटनांनी मोर्चाला सुरुवात केली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील कामगार अडचणीत आला आहे. कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. आठ तास काम देण्याऐवजी 12 ते 14 तास काम करून घेतले जात आहे. केंद्र सरकार कामगारविरोधी धोरण राबवत आहे, असा आरोप संघटनांनी केला. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी संघटनांनी दिला आहे.
कामगाराला किमान 21 हजार रुपये वेतन द्यावे, निवृत्तीनंतर 10 हजार रुपये पेन्शन द्यावी, स्वामीनाथन् आयोग लागू करावा. सध्या काही विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने कामगार घेतले जात आहेत, ते थांबवावेत व कायमस्वरुपी कामगार भरती करून घ्यावी. रेल्वे, बँक, विमा या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो तातडीने थांबवावा. अंगणवाडी कर्मचारी, मध्यान्ह आहार आणि आशा कार्यकर्त्यांना योग्य वेतन द्यावे, वीज व पाणी दर कमी करावा, यासह इतर मागण्या सीटू, आयटक आणि इतर संघटनांनी केल्या आहेत.
केएसआरटीसी कर्मचाऱयांचे आंदोलन
केएसआरटीसी कामगार संघटनेनेही तीव्र आंदोलन छेडले. आम्हाला वेतनामध्ये सरकारी नियमानुसार वाढ करावी. वेळेत भत्ता द्यावा, निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱयांप्रमाणेच पेन्शन द्यावी, कामाचे तास कमी करावेत, यासह इतर मागण्या या संघटनेने केल्या आहेत.
विमा कर्मचारी संघटना
विम्याला घेण्यात येणारा जीएसटी कमी करावा, खासगीकरण थांबवावे, किमान वेतन आणि निवृत्तीनंतर पेन्शन केंद्रीय कर्मचाऱयांप्रमाणे द्यावी, या मागण्यांसाठी विमा कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. विमा कर्मचारी विविध विभागात काम करत असतात. त्यांना समान वेतन देणे गरजेचे आहे, असेही म्हटले आहे.
मोबाईल विक्री दुकानदारांचे आंदोलन
मोबाईल दुकानदारांनी ऑनलाईन खरेदी-विक्री बंदी करावी, जीएसटी कमी करावा यासाठी आंदोलन केले. जिल्हय़ामध्ये 25 हजारहून अधिक दुकाने आहेत. यामध्ये तरुणवर्ग मोठय़ा प्रमाणात काम करत आहे. मोबाईल विक्रीतून रोजगार उपलब्ध होत आहे. असे असताना डिजिटल इंडियाच्या नावाखाली ऑनलाईन मोबाईल विक्री सुरू आहे, ती चुकीची आहे. यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. तेव्हा ऑनलाईन विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी मोबाईल विक्रेत्या दुकानदारांनी केली आहे.
मेडिकल विक्री प्रतिनिधींचे आंदोलन
आम्हाला 24 तास कामाला जुंपण्यात येत आहे. देण्यात येणारे वेतन हे तुटपुंजे आहे. किमान 21 हजार वेतन लागू करावे. महिला प्रतिनिधींना प्रसूतीसाठी पगारी सुटी द्यावी, कामाची मर्यादा आठ तास करावी, यासह इतर मागण्यांसाठी मेडिकल विक्री प्रतिनिधी असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
औषधासाठी लागू केलेला जीएसटी कमी करावा. आम्हाला इतर कामगारांप्रमाणे वेळ द्यावा, कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्या त्यांनी निवेदनात केल्या आहेत.
काँग्रेसतर्फेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
केंद्र सरकार कामगारविरोधी धोरण राबवत आहे. त्यामुळे देशातील कामगार अडचणीत आला आहे. कामगारांविषयी या सरकारला कोणतीही आस्था नाही. कामगारांना किमान वेतन व निवृत्ती वेतन देणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे भाजप सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मोदी हटाव, देश बचाव असे म्हणत निषेध नोंदविण्यात आला.
जीवन विवेक प्रति÷ान
देशातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन होणे गरजेचे आहे. याचबरोबर कामगारांच्या कल्याणासाठी सरकारने योजना राबविणे महत्त्वाचे आहे. कामगार कायद्यानुसार कामगारांना त्यांच्या सुविधा दिल्याच पाहिजेत, अशी मागणी जीवन विवेक प्रति÷ानच्यावतीने करण्यात आली. बांधकाम कामगारांसह इतर असंघटित कामगारांना सरकारी कर्मचाऱयांप्रमाणेच सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या संघटनांनी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी आणि शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन दिले.
यावेळी आयटक बी. व्ही. कुलकर्णी, कॉ. नागेश सातेरी, सी. एस. बिदनाळ, जी. व्ही. कुलकर्णी, एस. के. कुलकर्णी, सचिन कलवार, अशोक पावले, अनिल आजगावकर, संजू आंबेकर, प्रसाद देसाई, ओजस पत्रावळी, विशाल एल., मंदा नेवगी, नागेश निलजण्णावर, मीनाक्षी दपडे, लक्ष्मी नायर, सरोजा कांबळे, गुरुनाथ कांबळे, जयश्री माळगी, ऍड. आर. पी. पाटील, नसीर पठाण, नंदू हेडा, नटराज काकती यांच्यासह कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.









