वाहनधारकांचे हाल, युवा समितीचे कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात
वार्ताहर /नंदगड
कापोली ते कोडगई रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्ताचा वाली कोण? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक वर्षापूर्वी कापोली ते कोडगई या रस्त्यावर फक्त मुरूम टाकण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार कै. अशोक पाटील यांच्या प्रयत्नातून रस्त्याची डागडुजी व डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांची अडचण दूर झाली होती. मात्र गेल्या काही वर्षापासून रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली असून रस्ता मोठय़ा प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहन चालविणे मुश्कील झाले आहे.
त्याचबरोबर नागरिकांना चालत जाणेही मुश्कील बनले आहे. याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य संभाजी देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत सातत्याने माहिती दिली आहे. तरीही ग्रामस्थांच्या मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कापोली, शिदोळी बी. के. शिंदोळी के. एच., शिवठाण, कोडगई, सुवातवाडी, चिंचेवाडी, कुंभार्डा, कुंभार्डा मठ या गावातील जनतेला व वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे याबाबत वेळीच लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समितीच्या माध्यमातून या परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.









