उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा दावा : आठवडय़ातील सर्व दिवस मतदारसंघासाठी काम
प्रतिनिधी /काणकोण
2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाची मंडळ समिती, महिला मोर्चा तसेच युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते आपल्याबरोबरच असतील. आपला मागचा सर्व इतिहास जर पाहिला, तर आपण यापूर्वी अपक्ष, काँग्रेस आणि भाजपतर्फे निवडणूक लढविलेली आहे. या मतदारसंघात काम करणाऱया व्यक्तीची गरज आहे. आपण आठवडय़ातील सर्व दिवस मतदारसंघात राहून 24 तास लोकांना सेवा देत असतो, असे त्यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
त्याचबरोबर ज्या यंत्रणेने काणकोण मतदारसंघाचे सर्वेक्षण केले आहे त्याचा आपल्यावर कसलाच परिणाम होणार नाही. मात्र या सर्वेक्षण अहवालामुळे मतदारांमध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता फर्नांडिस यांनी व्यक्त केली. आपला मतदारसंघातील मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे येणाऱया निवडणुकीत जे कोणी निवडणूक लढवतील तो त्यांचा हक्क आहे, मात्र आपला विजय हा निश्चित असेल, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काणकोण भाजप मंडळ समितीचे अध्यक्ष नंदीप भगत आणि अन्य कार्यकर्ते, महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. काणकोणच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये कसलेच मतभेद नाहीत. काणकोणात भाजपाच्या उमेदवारीवर तीन व्यक्ती दावा करत आहेत. मात्र पक्ष ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करणे हे पक्ष कार्यकर्त्यांचे काम आहे. त्यामुळे काणकोणचे भाजपा मंडळ आणि अन्य समित्या भाजपाच्या उमेदवारासाठी काम करतील, असे यावेळी बोलताना नंदीप भगत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री चषक महोत्सव लवकरच
दरम्यान, काणकोण मतदारसंघात मुख्यमंत्री चषक महोत्सव लवकरच होणार असून त्यात कला आणि क्रीडाचे एकूण 13 प्रकार असतील. त्या महोत्सवात काणकोणच्या युवकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतीश प्रभुदेसाई यांनी केले. क्रीडा विभागात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, बुद्धिबळ, फुटबॉल, बॅडमिंटन, पॉवर लिफ्टिंग हे 7 प्रकार, तर कला विभागात घुमट आरती, एकेरी व समूह नृत्य, फुगडी, चित्रकला आणि रांगोळी हे सहा प्रकार असतील. या स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटांत घेण्यात येतील. मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर या स्पर्धा होणार असून या मतदारसंघातील 1500 युवक-युवती त्यात सहभागी होणार आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे या ठिकाणी खेळ किंवा कला क्षेत्रातील कार्यक्रमांवर बंदी आली. त्यामुळे युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून नोंदणीसाठी चावडीवरील जुन्या बसस्थानकाजवळ 20 पर्यंत खास सुविधा तयार करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकतादिन म्हणून साजरी केली जात असून केरळ येथून आलेल्या सायकलस्वारांचे आज 11 रोजी पोळे सरहद्दीवर भव्य स्वागत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय एकतेचा संदेश घेऊन केरळ येथून आलेले 16 सायकलस्वार गुजरातपर्यंत जाणार आहेत. या सायकरस्वारांचे पोळे चेकनाक्यावर स्वागत केल्यानंतर गुळेपर्यंत त्यांना पोहोचविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात काणकोण भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.









