आदिवासी समाजाने अजूनही टिकवून ठेवलेली परंपरा, गुरांची पूजा करण्याबरोबर घातली जातील नवीन ‘दांवी’
प्रतिनिधी/ काणकोण
कृषी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला गुरांचा सण म्हणजे गुरांचा पाडवा आज 16 रोजी काणकोण तालुक्यात मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात हा सण पोळा म्हणून साजरा केला जातो. एका बाजूने सरकार शेती व्यवसायाला, दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देत असतानाच मोठय़ा प्रमाणात भटक्या गुरांची समस्या सतावत आहे. मडगाव ते पोळेपर्यंतच्या हमरस्त्यावर सर्वत्र गुरांचे कळप ठाण मांडून बसलेले दिसतात. गरिबांचे पोशिंदे म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या गायी-बैलांना एक दिवस तरी विश्रांती मिळावी, त्यांना गोडधोड खाऊ घालावे या प्रामाणिक हेतूने आजही काणकोण तालुक्यातील विशेषता आदिवासी समाजाकडून या सणाकडे पाहिले जाते.
आजच्या ट्रक्टर, पॉवर टिलरच्या जमान्यात नांगरणी, पेरणी, मळणीसारखी कामे यंत्रे करत असताना गावडोंगरी, खोतीगावसारख्या भागांमध्ये मात्र आजही पाळीव जनावरांना तेवढय़ाच मायेने गोंजारले जाते. पूर्वी प्रत्येक शेतकऱयाकडे गुराखी असायचा. आज जनावरांना पाळणेच सोडून दिल्यामुळे ‘राखणा’ बंद झालेला असला, तरी आदिवासी समाजामध्ये आजही गुराखी आढळतो आणि सकाळी ते पाळीव प्राण्यांना चरण्यासाठी घेऊन जातात, अशी माहिती मार्ली येथील म्हाबळू गावकर यांनी दिली.
गुरांची केली जाते पूजा
गुरांच्या पाडव्याच्या दिवशी कसलेच काम द्यायचे नाही. सकाळी त्यांना आंघोळ घातली जाते. गंध, अक्षता लावून त्यांची पूजा केली जाते. गळय़ात फुलांच्या माळा, केळी, पोहे, कणगां, भाकरी, नारळ बांधला जातो. त्या दिवशी जुने दांवे काढून नवीन दांवे बांधले जाते. गुरांना गोडधोड खायला घातले जाते. त्यापूर्वी गोठा स्वच्छ केला जातो आणि गायी-बैलांना रानात चरण्यासाठी सोडले जाते.
गुरे गोठय़ात परतल्यानंतर धेणल्याचे विसर्जन
गुरांच्या गळय़ात बांधलेला नारळ, केळी व अन्य साहित्यावर गुराख्याचा अधिकार असतो. संध्याकाळी 5 च्या दरम्यान परत या गुरांना गोठय़ात घेतले जाते. त्यापूर्वी गोठय़ात धेणला पूजला जातो. धेणला हा गुराख्याचे प्रतीक असून गायी-बैल गोठय़ात परतल्यानंतर या धेणल्याचे विसर्जन केले जाते, अशी माहिती नुवें-श्रीस्थळ येथील चंद्रकांत शाणू वेळीप यांनी दिली.
नवीन दांवी खरेदी करण्याकडे कल

आजही चावडी बाजारात तयार दांवी विक्रीला येतात.आदिवासी समाजातील लोक ती विणून तयार करतात. आज दाव्यांचा दर वाढलेला आहे. परंतु शेतकरी वर्ग कितीही महाग झाली, तरी ती विकत घेतात आणि गुरांच्या पाडव्याच्या दिवशी आपल्या गुरांना नवीन दांवी बांधतात, अशी माहिती देळे-काणकोण येथील सुभाष शेट यांनी दिली. परिस्थिती कितीही बदललेली असली आणि आपण कितीही तांत्रिक युगाकडे मार्गक्रमण करत गेलो, तरी कृषिवलांचा हा सण मात्र असाच चालू राहील, असे मत श्रीस्थळ जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनय तुबकी यांनी व्यक्त केले.









