पाळोळे समुद्रकिनारा फुलून गेला
प्रतिनिधी/ काणकोण
संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटातून मार्गक्रमण करत असताना देशाच्या विविध भागांतील पर्यटकांनी काणकोणातील पाळोळे, होवरे, राजबाग किनाऱयांवर सध्या नववर्षाची मजा लुटण्यासाठी गर्दी केली असून विशेषता पाळोळे समुदकिनारा पर्यटकांनी फुलून गेला आहे. त्यात विशेषता महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यांतील पर्यटकांचा अधिक भरणा आहे.
24 पासून ही गर्दी वाढायला लागली असून बहुतेक पर्यटक स्वतःच्या खासगी वाहनांनी या ठिकाणी येत आहेत. पाळोळे येथील काणकोण पालिकेचा वाहनतळ भरून गेल्यानंतर वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱया पोलीस कर्मचाऱयांवरचा ताण वाढलेला आहे. यामुळे चार रस्ता येथील दूरध्वनी केंद्रानजीकच्या मोकळय़ा जागेवर वाहने पार्क करण्यात येत असून जे पर्यटक स्वयंपाकाचे आणि अन्य साहित्य घेऊन येतात त्यांच्यावर मुलांबाळासहित पाळोळे किनाऱयापर्यंत चालत जाण्याची पाळी आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाळोळे किनाऱयावरही 24 तास पोलीस संरक्षण ठेवण्यात आले आहे.
या पर्यटकांपैकी अवघेच जण किनाऱयावरील तंबू किंवा हॉटेलमध्ये राहतात. बाकीचे अन्यत्र कोठे तरी राहून केवळ किनाऱयाची मजा लुटतात, किनाऱयावरच स्वयंपाक करत असतात. काही जण पाळोळे किनाऱयावर समुद्रसफरीची मजा लुटण्यासाठी येत असतात. या ठिकाणी 50 पेक्षा अधिक डॉल्फीन दर्शन घडविणाऱया नौका आहेत. सदर व्यावसायिकांची संघटना आहे. मात्र पर्यटकांची संख्या जरी वाढली असली, तरी समुद्रसफरीसाठी दिवसाला चार ते पाचच ग्राहक मिळत असतात. अन्य पर्यटक समुद्रस्नानाचा लाभ घेऊन मौजमजा करून जात असतात, अशी माहिती या व्यवसायात नौका चालविणाऱया काही व्यावसायिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. कोरोना महामारीमुळे किनाऱयावर यंदा पर्यटक फिरकणार नाहीत असा बोलबाला झाला होता. पर्यटक वाढले असले, तरी महसुलाच्या बाबतीत विशेष फायदा झालेला नाही, अशा प्रतिक्रिया काही व्यावसायिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.









