आठवडाभरापासून पाण्याची टंचाई, साहाय्यक अभियंत्यांना घेराव
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघातील पैंगीण पंचायत, पालिका क्षेत्र आणि श्रीस्थळ पंचायतीमध्ये मागच्या आठवडय़ापासून पिण्याची पाण्याची तीव्र टंचाई भासत असून सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना येथील नागरिक मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत होते, असा आरोप करून काणकोण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जनार्दन भंडारी यांनी जाब विचारण्यासाठी काणकोणच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी काणकोणच्या पाणीपुरवठा कार्यालयाचे साहाय्यक अभियंता लेस्टर डिसोझा यांना घेराव घातला गेला. यावेळी त्यांच्याबरोबर गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, श्रीस्थळचे सरपंच रामू नाईक, काणकोण गट काँग्रेस अध्यक्ष प्रलय भगत, महिला काँग्रेस अध्यक्षा उर्सिला डिकॉस्ता, प्रवक्त्या पल्लवी भगत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मागच्या आठ दिवसांत या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई भासत असून अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागांत टँकरने पाणीपुरवठा केरण्यात येत असला, तरी खात्याच्या वेळकाढूपणाचा हा परिणाम असल्याचा स्पष्ट आरोप यावेळी भंडारी आणि प्रशांत नाईक यांनी केला. बऱयाच ठिकाणचे पंप नादुरुस्त झालेले आहेत. कित्येक ठिकाणच्या जलवाहिन्या फुटलेल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती, तर एप्रिल-मे महिन्यांत या भागात अधिक समस्या निर्माण होण्याची शक्यता यावेळी मोर्चेकऱयांनी व्यक्त केली आणि लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याची मागणी केली.









