बेळगाव /प्रतिनिधी
शहरात सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे… अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते… अर्धवट स्थितीत असलेले रस्ते… अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक… वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकदा का शहरात प्रवेश केला की वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांची दमछाक सुरू होते. हे चित्र सध्या शहरातील अनेक रस्त्यांवर दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून काकतीवेस ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱया पर्यायी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याची बाब ठरत आहे. हा रस्ता आधीच लहान असल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱया वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चन्नम्मा चौकासह इतर रस्त्यांवर स्मार्ट सिटीअंतर्गत विकास साधण्यात येत आहे. त्यामुळे चन्नम्मा चौकापासून कोल्हापूर सर्कलपर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शेजारील लहान पर्यायी मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन कोंडी होत आहे. या बरोबरच चव्हाट गल्लीतही वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या चन्नम्मा चौकासह शेजारील इतर सर्व रस्त्यांचे काम सुरू असल्याने इतर रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे बाजारात येण्यासाठी वाहनधारकांना वळसा घालून यावे लागत आहे. बाजारातून बाहेर पडताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच लहान रस्त्यांवर व गल्ल्यांतून पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कामे तातडीने पूर्ण करून रस्ते सुरळीत करावेत, अशी मागणी होत आहे.









