वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसचे ज्ये÷ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वोरा यांनी रविवारीच 93 वा वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांनी मोतीलाल वोरा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
मोतीलाल वोरा यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच ते उत्तर प्रदेशचे राज्यपालदेखील होते. त्यांनी दोनवेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषवले होते. तत्पूर्वी 1972 मध्ये त्यांनी मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर मध्यप्रदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. नंतर 1977 आणि 1980 साली ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेले होते. 1980 साली त्यांना अर्जुनसिंग यांच्या मंत्रिमंडळात उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
13 मार्च 1985 रोजी मोतीलाल वोरा यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर जवळजवळ 3 वर्षे ते या पदावर विराजमान होते. 13 फेब्रुवारी 1988 साली त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 14 फेब्रुवारी 1988 रोजी त्यांनी केंद्रातील आरोग्य, कुटुंब कल्याण व नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. एप्रिल 1988 मध्ये ते मध्यप्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांनी 26 मे 1993 ते 3 मे 1996 या कालावधीत उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.
गांधी घराण्याशी निकटचे संबंध
मोतीलाल वोरा भारतीय राजकारणातील एक प्रति÷ित राजकारणी म्हणून ओळखले जातात. ते गांधी कुटुंबीयांच्या अतिशय जवळचे मानले जातात. त्यांचा जन्म 20 डिसेंबर 1928 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्हय़ात झाला होता. काँग्रेस पक्षाच्या खजिनदार पदावर ते तब्बल 17 वर्षे कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्यानंतर मोतीलाल वोरा यांच्यावर अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकण्यात आली होती.