खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे मत
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेसने अन्य पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी आपण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे. काँग्रेस पक्षाने युती करून इतर पक्षांना संधी देणे म्हणजे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याचे मत दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
काँग्रेस पक्षाचे आमदार फुटणार नाही व त्यासाठीच अगोदरच चांगले उमेदवार निवडावे व त्यांना उमेदवारी द्यावी असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. गोव्यात काँग्रेस व भाजप हे दोनच प्रमुख पक्ष आहेत. अन्य पक्षाचे एक-दोन आमदार निवडून आले तरी ते सरकार घडवू शकणार नाही. त्यामुळे मतदारांनी पूर्ण विचारांअंती मतदान करणे आवश्यक असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भाजपकडून केवळ खोटी आश्वासने
भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षात गोव्यातील जनतेला खोटी आश्वासने दिली. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे जनता या सरकारला कंटाळली आहे. भाजपला हटविण्यासाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय असून गोव्यातील जनतेने हा पर्याय निवडावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रेल्वे दुपदरीकरणाला विरोध, राज्यातील खराब रस्ते व त्यामुळे होणारे अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप बळी, सरकारच्या योजनाचा लाभ जनतेला न मिळणे यावर सातत्याने जनता आवाज करीत असली तरी भाजप सरकारला त्यांच्या भावनाची कदर नसल्याचा आरोप यावेळी खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी केला.









