प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसने ग्रामीण भागामध्ये जोरदार प्रचार केला. त्यानंतर आता शहराकडे काँग्रेसने लक्ष दिले असून माजी आमदार फिरोज सेठ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मतदार संघातील विविध ठिकाणी प्रचारफेरी काढून तसेच काही ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन प्रचार केला.
सोमवारी काँग्रेसचे आजी-माजी आमदार यांच्या सोबत प्रचार केला. सतीश जारकीहोळी यांनी बार असोसिएशनसह इतर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी विविध ठिकाणांहून त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. काँग्रेसशिवाय पर्याय नाही, भाजपने साऱयांची निराशा केली असून आम्हाला एकवेळ संधी द्या, त्या संधीचे सोने करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
शहरातील कसाई गल्ली, दरबार गल्ली, हनुमाननगर, अंजनेयनगर, रुक्मिणीनगर, कणबर्गी यासह इतर परिसरात प्रचार केला. यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रेसला विजयासाठी अनुकूल स्थिती : पत्रकार परिषदेत माजी मंत्री एम. बी. पाटील यांची माहिती

भाजप सरकारने देशवासियांची दिशाभूल केली आहे. महागाईने कहर केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा काँग्रेसला मिळणार असून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमच्या एका विजयी उमेदवारामुळे त्यांच्या सरकारला धोका होणार नसला तरी जनता मात्र त्यांना धडा शिकविणार हे निश्चित असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, गणेश हुक्केरी, माजी खासदार अनिल लाड उपस्थित होते.
गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ यासह इतर देशांमध्ये पेट्रोलचे दर कमी आहेत. मात्र, भाजपने देशामध्ये पेट्रोलचा दर उच्चांकी करून जनतेला वेठीस धरले आहे. त्यामुळे निश्चितच जनता त्यांना धडा शिकवेल, असेही एम. बी. पाटील यांनी सांगितले. काळा पैसा आणणार होते, तो कोठे आहे? 15 लाख देणार होते ते कोठे आहेत? याची उत्तरे आता त्यांना जनतेला द्यावी लागणार आहेत. भाजपचे काही नेते काँग्रेसची खिल्ली उडवत आहेत. मात्र, आता त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे. राज्यातील जनता त्यांना योग्य धडा शिकवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.









