राजकारणातील ‘चाणक्य’ हरपल्याची भावना
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्ये÷ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे बुधवारी निधन झाले. शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे बुधवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निधनसमयी ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर ‘राजकारणातील चाणक्मय’ हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. 15 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
अहमद पटेल यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा फैजल यांनी ट्विटरद्वारे दिली. अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय व अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. सोनिया गांधी यांना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. शिवाय सोनिया गांधी पक्षाध्यक्षा असताना त्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांनी चोखपणे पार पाडले होते.
पडद्यामागे राहून काम करणाऱया अहमद पटेल यांचे पक्षामध्ये मोठे वजन होते. ते तीन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले होते. त्याचबरोबर पाच वेळा राज्यसभेचे खासदार होते. गांधी कुटुंबांच्या विश्वासातील नेत्यांमध्ये त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जात असे. ऑगस्ट 2018 मध्ये त्यांच्यावर पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. 1977 मध्ये अवघ्या 26 वषी ते गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले होते.
मान्यवरांकडून शोक
सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबरच काँग्रेसच्या नेत्यांनी अहमद पटेल यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, आपण एक चांगला मित्र, सहकारी व कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांकडूनही श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘अहमद पटेल यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले. त्यांनी सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षे समाजाची सेवा केली. त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने राजकीय जीवनामध्ये यश संपादन केले. काँग्रेस पक्षाची मजबूत पायाभरणी करण्यात त्यांची भूमिका ही कायम लक्षात राहणारी आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो’ असे मोदी म्हणाले.