सध्यस्थितीत युतीचा विचार नाहीच : महाआघाडीचे स्वप्न जवळपास भंग : ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची माहिती
सर्वांना विश्वासात घेऊनच उमेदवार निश्चिती
गोव्यातील जनता सध्या बदलाच्या प्रतीक्षेत
चाळीसही मतदारसंघात लढणार काँग्रेस कमांडर
प्रतिनिधी / पणजी
एका अनपेक्षित घडामोडीत काँग्रेसने ’एकला चलो रे’ चा नारा लावला आहे. पक्षाचे केंद्रीय नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेस चाळीसही मतदारसंघात निवडणूक लढविण्यास सज्ज आहे, असे जाहीर केल्याने त्यांनी अनुल्लेखानेच युतीचा विषय बाजूला फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून आता युतीसाठी इच्छूक असलेल्यांचा मनोभंग होतो की येत्या काळात गोव्याच्या राजकारणात अन्य मोठय़ा घडामोडी घडणार तेही स्पष्ट होणार आहे.
दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेले काँग्रेस पक्षाचे गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी पक्षाचे आमदार, आजी-माजी खासदार, प्रदेश समिती पदाधिकारी, गट अध्यक्ष तसेच प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर काल गुरूवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केल्याने महाआघाडीचे स्वप्न जवळपास भंग पावले आहे.
पुढे बोलताना चिदंबरम यांनी काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरामुळे मतदार दुखावले आहेत हे खरे असले तरी त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीमुळे लोक दुखावले आहेत, असा दावा केला.
सर्वांना विश्वासात घेऊनच उमेदवार निश्चिती
सध्यस्थितीत राज्यात काँग्रेसला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे सध्यातरी युतीचा कोणताही विचार नाही. सध्या पक्षाचे लक्ष्य सर्व चाळीसही मतदारसंघावर आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर उमेदवार निवडताना प्रत्येक गट समिती, युवा काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल यांच्यासह सर्व सक्रिय कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल. तसेच प्रामाणिक, निष्ठावान व पक्षाच्या तत्वांशी बांधिलकी असलेल्यांनाच प्राधान्य देण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले.
गोव्यातील जनता सध्या बदलाच्या प्रतीक्षेत
दोन दिवसांच्या गोवा दौऱयात वेगवेगळ्या घटकांसोबत चर्चा केली. त्यातून राज्यात काँग्रेसला अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचे दिसून आले. जनतेला यावेळी बदल हवा असल्याचेही स्पष्ट झाले असून मतदार काँग्रेसची निराशा करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्यातरी युतीचा विचार नाही
असे अनुकूल वातावरण असल्याने सध्यातरी युतीच्या प्रश्नावर कोणताही विचार झालेला नाही. तरीही आवश्यता भासलीच तर योग्यवेळी त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगून चिदंबरम यांनी युतीच्या प्रश्नाला बगल दिली. त्याचबरोब काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नाचे उत्तर देण्याचेही त्यांनी टाळले व चाळीसही मतदारसंघात आमचे 40 कमांडर लढणार आहेत, असे ते म्हणाले. प्रत्येक उमेदवारास प्रचारास पुरेसा अवधी मिळेल याची पूर्ण काळजी घेऊनच उमेदवार जाहीर करण्यात येतील. लोकांना यावेळी बदल हवा आहे, त्यामुळे पुढील सरकार हे काँग्रेसचेच असेल, असा दावाही त्यांनी केला.
मोदी सरकारचे अनेक निर्णय मुर्खपणाचे
नोटाबंदी, सदोष जीएसटी, महामारीच्या काळात सरकारच्या हातातून गरीबांसाठी पैसा सुटला नाही. तसेच मालमत्ता, मुद्रीकरण, यासारखे अनेक निर्णय जे या सरकारने घेतले ते पूर्णतः मुर्खपणाचे होते. या मुर्खपणामुळेच देशाची अर्थव्यवस्था आतापर्यंतच्या सर्वांत खालच्या स्तरावर पोहोचली आहे, गतवर्षी तर आम्ही पिछाडीवरच होतो, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली. सध्या देशाची अर्थव्यवस्था सुधारत असली तरीही चालू आर्थिक वर्षात त्यात फार मोठा फरक जाणवणार नाही. कदाचित पुढील वर्षी ती पूर्वपदावर येऊ शकते. मात्र केंद्र सरकारने आणखी मुर्खपणा करून चालणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, राज्य निरीक्षक प्रकाश राठोड, दक्षिण गोवा जिल्हा निरीक्षक सुधीर, उत्तर गोवा जिल्हा निरीक्षक मन्सूर अली खान यांची उपस्थिती होती.









