वृत्तसंस्था/ दुबई
मायदेशातील कसोटीत पहिल्यांदाच पाच बळी मिळविणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या ताज्या मानांकनात सहा स्थानांची प्रगती करीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. माजी कर्णधार विराट कोहलीची मात्र नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.
बेंगळूरमध्ये नुकत्याच झालेल्या लंकेविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत बुमराहने 8 बळी मिळविले. या कामगिरीमुळे त्याने शाहीन आफ्रिदी, काईल जेमिसन, टिम साऊदी, जेम्स अँडरसन, नील वॅग्नर, जोश हॅझलवुड यांना गोलंदाजांच्या क्रमवारीत मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. फलंदाजांत चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने विराट कोहलीची चार स्थानाने घसरण झाली आहे. मात्र टॉप टेनमधील स्थान त्याने टिकवले असून तो आता नवव्या स्थानावर आहे. रिषभ पंत दहाव्या स्थानावर स्थिर राहिला आहे. कोहलीने पहिल्या कसोटीत 45 तर दुसऱया कसोटीत 23 व 13 धावा जमविल्या.
भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही आपले सहावे स्थान कायम राखले आहे. बहरात असलेल्या श्रेयस अय्यरला लंकेविरुद्ध नोंदवलेल्या 92 व 67 धावांच्या मॅचविनिंग खेळीना बक्षीस मिळाले असून एकदम 40 स्थानांची झेप घेत तो 37 व्या स्थानावर पोहोचला आहे. लंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने बेंगळूर कसोटीत झुंजार शतक नोंदवताना 107 धावा काढल्या. तो आता तिसऱया स्थानावर पोहोचला असून कारकिर्दीत त्याने मिळविलेले हे आजवरचे सर्वोच्च स्थान आहे. अष्टपैलूंच्या यादीत विंडीजच्या जेसॉन होल्डरने भारताच्या रविंद्र जडेजाला मागे टाकत पुन्हा अग्रस्थान मिळविले आहे. मोहाली कसोटीत जडेजाने 9 बळी व नाबाद 175 धावांची खेळी करीत या यादीत पहिले स्थान मिळविले होते. पण त्याला ते फार काळ टिकविता आले नाही. रविचंद्रन अश्विन, बांगलादेशचा शकीब अल हसन, इंग्लंडचा बेन स्टोक्स यांनी अनुक्रमे पुढचे क्रमांक मिळविले आहेत. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने एका स्थानाची प्रगती करताना जडेजाला मागे टाकत 17 वे स्थान मिळविले. पॅट कमिन्स, अश्विन, कागिसो रबाडा यांनी मात्र आपले पहिले तीन क्रमांक कायम राखले आहेत









