चाकरमान्यांची उसळतेय गर्दी, दिवसभरात 1200हून अधिक वाहने कोकणात
प्रतिनिधी/ खेड
मुंबई, पुणे येथून गावी येणाऱया चाकरमान्यांचा लोंढा वाढत चालला आहे. कशेडीतील चेकपोस्टवर करण्यात येणाऱया तपासणी मोहिमेमुळे वाहनचालकांची होणारी रखडपट्टी कायम आहे. चेकपोस्टवर चाकरमान्यांची गर्दी उसळत असल्याने यंत्रणाही अक्षरश: मेटाकुटीस आल्या आहेत. दिवसभरात 1200 हून अधिक वाहने कोकणात दाखल झाली असून 3 हजारांहून अधिक चाकरमान्यांचा समावेश आहे. रेडझोन व ग्रीनझोनमधून येणाऱया चाकरमान्यांच्या माहितीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
सरकारने कोकणात जाण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून प्रवास करण्यास मुभा दिल्यापासून चाकरमान्यांनी गावची वाट धरली आहे. कशेडी चेकपोस्टवर चाकरमान्यांची तपासणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेस उशिर होत असल्याने चाकरमान्यांना 8 ते 10 तास तिष्ठत बसावे लागत आहे. प्रशासकीय यंत्रणांवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी मुंबईतून येणाऱया चाकरमान्यांना त्या-त्या तालुक्यात धाडण्यात येत आहे. यासाठी तालुकानिहाय चाकरमान्यांची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र कक्षही उभारण्यात आले आहेत.
या ठिकाणी केवळ खेड तालुक्यातील चाकरमान्यांची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे प्रशासनावरील ताण काही अंशी कमी झाला असला तरी रेडझोन व ग्रीनझोनमधून येणाऱया चाकरमान्यांची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून येथे लांबच लांब रांगा लागत आहे. त्यातच चाकरमान्यांचे लोंढेच्या लोंढे दाखल होत असल्याने तपासणी करताना यंत्रणांची दमछाक होत आहे.
महामार्गावर होणाऱया वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना घाम फुटत आहे. याचमुळे कशेडी चेकपोस्टवर शासकीय यंत्रणा व चाकरमानी यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. मुंबईसह उपनगरातून पायी प्रवास करत जंगलमय भागातून येणाऱया चाकरमान्यांची संख्याही वाढत चालल्याने पोलीस यंत्रणेला जागता पहारा ठेवावा लागत आहे. याचमुळे कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या विन्हेरे मार्गासह तुळशी व नातूनगर फाटय़ाजवळ पोलिसांची जादा कुमक कार्यरत आहे. याशिवाय महामार्गावरही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
169 जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात कशेडी चेकपोस्टवर अडवण्यात आलेल्या चाकरमान्यांना बसद्वारे लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील कक्षात निगराणीखाली ठेवण्यात येत आहे. सोमवारी 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 97 जणांची नव्याने भर पडल्याने या ठिकाणची संख्या 158 वर पोहोचली आहे. कळंबणी येथील कक्षात 11 जण असून 2 संस्थात्मक विलगीकरण कक्षात 169 जण देखरेखीखाली आहेत.









