प्रतिनिधी / खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विंटो कार अचानक आग लागून खाक झाली. सुदैवाने प्रवाशी बाहेर पडल्याने बालबाल बचावले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होवून दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
विंटो कार चिपळूण येथून मालेगावच्या दिशेने जात होती. कारमध्ये चौघेजण प्रवास करत होते. हे चौघेजण कंपनीच्या कामासाठी मालेगाव येथून तालुक्यातील लोटे येथील औद्योगिक वसाहतीत आले होते. येथील काम आटोपल्यानंतर ते चिपळूणला गेले. चिपळूण येथून परतीच्या प्रवासाला निघाले. कशेडी घाटातील अवघड वळणावर काहीतरी जळल्याचा वास आल्याने चौघेही प्रवाशी खाली उतरले. कारचे बोनेट उघडले असता अचानक कारने पेट घेतला.
या दुर्घटनेत चारही जणांचे साहित्य व बॅगा जळून खाक झाल्या. कारही बेचिराख झाली.
आगीचे वृत्त कळताच तातडीने नगरपरिषदेचा अग्निशमक बंब पाचारण करण्यात आला. तब्बल दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजुला लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.