प्रतिनिधी / कल्याण
राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अन्नधान्य वाटपातही स्वःताची राजकीय पोळी भाजून घेण्याची संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधींमध्ये चढओढ लागली आहे. लॉकडाऊन काळात काही नागरीकाना अत्यावश्यक वस्तूंची गरज आहे. हीच सुवर्णसंधी समजून कल्याण डोबीवली परिसरात देखील वस्तु वाटपात आजी व माजी नगरसेवकांत चढाओढ लागली आहे. अशाच प्रकारातून काल विठ्ठलवाडी पूर्वेतील नेहरूनगर प्रभागातील आजी माजी नगरसेवकांत वाद निर्माण होऊन याचे पर्यावसान कोळसेवाडी पोलिसात परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून या मध्ये ३० जणांचा समावेश आहे. या वादात ४ जण जखमी झाले आहेत.
प्राप्त माहीती नुसार नेहरुनगर प्रभागात या परिसरातील नगरसेवक विकी तरे आणि त्यांच्या नगरसेविका असलेल्या पत्नी मोनाली तरे यांच्या मार्फत नागरीकांत जिवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी कुपनचे वाटप करण्यात येत होते, परंतु या कुपन वाटपाला काही स्थानिक नागरीकांनी विरोध दर्शविला या परिसरात माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांचे वर्चस्व आहे. या मुळे ते या ठिकाणी आले असता तरे आणि रायभोळे समर्थकांत जोराचे भांडण सुरु झाले. या गडबडीत अज्ञात व्यक्तीने भिरकावलेला दगड रायभोळे यांच्या डोक्याला लागून ते कीरकोळ जखमी झाले. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या गडबडीची खबर कोळसेवाडी पोलिसांना लागल्यांतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तो पर्यंत परिसरातील जमाव निघून गेला होता. दरम्यान या घटनेविषयी दोन्ही गटांच्या काही व्यक्ती परस्पर विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सुमारे ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









