पुरुष गटात 37, महिला गटात 21 तर : बाल गटात 16 पथकांचा सहभाग
प्रतिनिधी /फोंडा
राजीव गांधी कला मंदिर फोंडा आयोजित राज्यस्तरीय 14 व्या अखिल गोवा पुरुष गटातील घुमट आरती वादन स्पर्धेला काल मंगळवारपासून सुरुवात झाली. एकूण 37 पथकांनी त्यात भाग घेतला आहे. महिला गटातील स्पर्धा 17 रोजी तर पहिली बाल गटातील घुमट आरती स्पर्धा 18 रोजी होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी तबलावादक रामकृष्ण वेलिंगकर, कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी, संचालक गिरीश वेळगेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. फोंडय़ाचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी 14 वर्षांपुर्वी ही स्पर्धा सुरु केली होती. आज पुरुष गटाबरोबरच महिला व बाल कलाकारांसाठीही घुमट आरती स्पर्धा होत आहे. अशा पारंपारिक कला टिकून राहण्यासाठी स्पर्धा आवश्यक आहे. अशा स्पर्धांतून कलाकारांना तर प्रोत्साहन मिळतेच शिवाय कलेतही नाविन्य येते, असे रितेश नाईक यावेळी बोलताना म्हणाले.
महिला गटात 21 पथकांनी भाग घेतला असून ही स्पर्धा 17 रोजी होणार आहे. बाल गटातील स्पर्धेत 16 पथकांनी भाग घेतला असून 18 रोजी ही स्पर्धा होईल. पुरुष गटातील अंतिम फेरी व बक्षीस वितरण सोहळा 20 सप्टें. रोजी होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले.









