गावात नव्यानेच स्थापन मंडळाच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय : मंडळ स्थापण्यामागचा उद्देश प्रशंसनीय
वार्ताहर /किणये
कर्ले गावात राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्यावतीने सोमवारी विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर महिलांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. गावात नव्यानेच या मंडळाची स्थापना करण्यात आली असून मेळावा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी मनीषा अशोक हट्टीकर होत्या. प्रारंभी ज्योती हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हटले. प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. डॉ. मधुरा गुरव उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे माजी महापौर शिवाजी सुंठकर, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील, डॉ. नितीन राजगोळकर आदी उपस्थित होते.
किणये ग्रा. पं. उपाध्यक्ष मल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते गणेश फोटो पूजन करण्यात आले. सदस्य विनायक पाटील यांनी विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन केले. राजमाता जिजाऊ फोटो प्रतिमेचे पूजन निवृत्त मुख्याध्यापक सी. ए. सांबरेकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन ग्रा. पं. माजी सदस्य पुंडलिक तारिहाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले फोटोचे पूजन माध्यमिक हायस्कूलच्या शिक्षिका कल्पना सातेरी यांनी केले.उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रेणुका नवनाथ खामकर यांनी प्रास्ताविक करून महिला मंडळ स्थापन करण्यामागचा उद्देश सांगितला. मंडळाच्या अध्यक्षा संपदा मोगरे व उपाध्यक्षा कमल सांबरेकर यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले. महिलांनी संघटित राहून गावचा व भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील मुलींना उच्चशिक्षण घेण्यासाठी महिलांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मनोगत डॉ. मधुरा गुरव यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे शिवाजी सुंठकर यांनी सांगितले. डी. बी. पाटील, डॉ. नितीन राजगोळकर व इतर मान्यवरांची भाषणे झाली. व्यासपीठावर ग्रा. पं. अध्यक्षा स्नेहल लोहार, सदस्या रंजना भास्कर, मुख्याध्यापिका पूजा पाटील, कल्पना सातेरी उपस्थित होत्या.
गावात पहिल्यांदाच महिलांसाठी असा भव्य कार्यक्रम झाल्यामुळे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सूत्रसंचालन नरसिंग देसाई यांनी केले. शशिकला तारीहाळकर यांनी आभार मानले.