प्रा. जे. पी. देसाई : ग्रंथ महोत्सवात कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा
प्रतिनिधी/ सातारा
सर्व जातीधर्मातील बहुजन, गोरगरिबांना शिक्षण मिळाले पाहिजे या पवित्र हेतूने पद्विभुषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱयात लावलेले रयत शिक्षण संस्थेचे रोपटे राज्यभर बहरले. त्यातून ज्ञानाचा वटवृक्ष तयार झाला आणि त्याच्या सावलीखाली अनेक पिढय़ांनी ज्ञानाच्या माध्यमातून विकासाची वाट धरली. बहुजनांना शिक्षण, स्त्राr मुक्ती व शिक्षण, मुल्यवर्धित शिक्षण, सामाजिक समता देणारे शिक्षण ही अण्णांची म्हणजेच रयत शिक्षण संस्थेची चतुसुत्री होती. त्यातून आजमितीस साडेचार लाख विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेत असून 14 हजार कर्मचारी ज्ञानगंगा पुढे नेण्याचे काम करत आहेत. तळागाळात शिक्षणाबरोबरच संस्कारही पोहोचवणारे कर्मवीर अण्णा हे त्यामुळे प्रत्येकासाठी महामानव असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते प्रा. जे. पी. देसाई यांनी केले.
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे आयोजित 21 व्या ग्रंथ महोत्सवात कर्मवीर भाऊराव पाटील नगरीतील व्यासपीठावर व्याख्यानातील पहिले पुष्प गुंफताना ’मला उमजलेले कर्मवीर अण्णा’ या विषयावर प्रा. देसाई बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, कोषाध्यक्ष प्रा. साहेबराव होळ, प्रदीप कांबळे, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. देसाई पुढे म्हणाले, मी रयत शिक्षण संस्थेत शिकलो नाही. रयत शिक्षण संस्थेत मी नोकरी देखील करत नाही. तरीही मी कर्मवीर अण्णा या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वावर माझ्या पित्याएवढेच प्रेम करतो. कारण कर्मवीरांनी जातीपातीचा विचार न करता सर्वांना शिक्षणाचे द्वार खुले करुन ज्ञानाची गंगा राज्यभर नेली. सर्व जातीधर्मातील मुलांसाठी एकच वसतीगृह ही संकल्पना कृतीतून यशस्वी करुन दाखवताना सामाजिक समतेचा पाया रोवला. 1924 साली कराड तालुक्यातील काले येथे रयतची स्थापना झाल्यानंतर त्यांनी साताऱयातून ज्ञानकार्यास आरंभ केला. सयाजीराव हायस्कूल हे रयतचे पहिले हायस्कूल. तर मोफत शिक्षण देणारे छत्रपती शिवाजी महाविद्यालय हे पहिले कॉलेज आणि शिक्षक घडवणारे आझाद कॉलेज एज्युकेशन हे पहिले महाविद्यालय साताऱयातील तर पहिली गावठी शाळा अण्णांनी साताऱयानजिक यवतेश्वर येथे सुरु केली.
आजमितीस राज्यभरातील 739 शाळा, विद्यालये, महाविद्यालयातून साडेचार लाख विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेत असून 14 हजार कर्मचारी ज्ञानदानाचा अण्णांचा यज्ञ तेवत ठेवत आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर तिथे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी युनियन बोर्डिंग सुरु करणाऱया कर्मवीरांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे जीवन रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी व्यतित केले. त्याग, सत्याची पाठराखण, गरिबांविषयी कळवळा असलेले ते ऋषीमुनी, संत आणि महापराक्रमी योध्दा देखील होते. मात्र, अण्णा हे या सर्वापलिकडे पोहोचलेले व्यक्तीमत्व होते. त्यांच्या त्यागाचा, कार्याचा मोठा महाग्रंथच असून त्यांच्या विचारांचे अनुसरुन प्रत्येकाने केले पाहिजे, असे प्रा. देसाई म्हणाले.
त्याग, संस्कार आणि सामाजिक समता
वसतीगृहातील विद्यार्थी आजार असले तर रात्रभर जागून त्याची सेवा करणारे कर्मवीर हे त्याग, संस्कार आणि सामाजिक समतेचे प्रेरकच होते. त्यामुळे रयत शिक्षण संस्था उभी करताना त्यांनी या संस्कारांची रुजवण केली. संस्था चालवताना स्वतःच्या पत्नीचे दागिने मोडताना देखील त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. तर मुलांच्या जेवणाच्या खर्चासाठी पत्नीचे मंगळसुत्र मोडून टाकताना देखील या दांपत्याला मुलांच्या प्रेमापुढे काहीच वाटले नाही. त्यांनी कधीही स्वतःच्या कुटुंबासाठी संस्थेच्या माध्यमातून एक रुपयाचा फायदा करुन घेतला नाही हा एवढा मोठा आदर्श एक ऋषीतुल्य कर्मवीरच देवू शकतात.
माझ्या बापाचे नाव बदलेन पण…
छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयाने कमवा व शिका चा मुलमंत्र जपत स्वावलंबनातून शिक्षणाचा जगातील पहिला पाया रोवला आहे. या कॉलेजला काही अडचण असताना कर्मवीर देणगी गोळा करत होते. त्यावेळी एका देणगीदाराने त्यांना मी देणगी देतो पण त्यांच्या कोणाचे तरी नाव महाविद्यालयास देण्याची मागणी पुढे ठेवली. मात्र कर्मवीरांनी स्वाभिमान कसा जपावा याचे उदाहरण समोर ठेवत त्यांना सांगितले की एक वेळ मी स्वतःच्या बापाचे नाव बदलेन मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे महाविद्यालयाला दिलेले नाव कधीही बदलणार नाही.









