बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने १५ नेवारीपासून पदवी, पदविका आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या इंटरमिजिएट सेमेस्टरचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषयक सर्व खबरदारी घेत हे वर्ग सुरु केले जाणार आहेत.
उच्च शिक्षण प्रभारी असलेले उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण सी.एन. यांनी सोमवारी राज्य कोविड तांत्रिक सल्लागार समितीशी बैठक घेतल्यानंतर एकूणच सर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने कर्नाटकातील दहावी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना १ जानेवारीपासून शाळांमध्ये प्रवेश घेण्यास परवानगी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
वरील अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग १७ नोव्हेंबर, २०२० रोजी सुरू झाले आहेत. उर्वरित वर्गातील विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याची मागणी डॉ. नारायण यांनी केली. याआधी विद्यार्थ्यांनी वर्ग सुरु करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.