दोन्ही राज्यांचे प्रवासी प्रतीक्षेत, बससेवा बंदचा बेळगाव आगाराला फटका
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यात जिल्हय़ांतर्गत व आंतरजिल्हा बससेवेला परवानगी दिल्याने राज्याच्या शेजारील राज्यांच्या बसेसेवेला प्रारंभ झाला. मात्र बेळगाव जिल्हय़ाला लागून असलेल्या व अधिक उत्पन्न मिळवून देणारी कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंदच आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या जनतेला खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने प्रवासी बससेवेच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर साधारण 22 मार्चपासून दोन्ही राज्यांची बससेवा बंद झाली. जवळजवळ 5 महिने उलटले तरी अद्याप बससेवा बंदच आहे. सध्या आंतरराज्य बसेसेवेला परवानगी मिळाली तरी दोन्ही राज्यांची बससेवा बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे. कर्नाटक परिवहन मंडळाने महाराष्ट्र एसटी महामंडळाकडे कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा सुरू करण्याबाबत विचारणा केली असता अद्याप महाराष्ट्र एसटी महामंडळाकडून होकारात्मक उत्तर आले नाही. त्यामुळे दोन्ही राज्यांची बससेवा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत चालल्याने महाराष्ट्र शासन बससेवा सुरू करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटक राज्यातून दररोज महाराष्ट्राच्या कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, मिरज आदी ठिकाणी धावणाऱया बसेची संख्या 350 हून अधिक आहे. त्याबरोबर महाराष्ट्रातून कर्नाटकात धावणाऱया बसगाडय़ांची संख्याही जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्हय़ाच्या सीमा या महाराष्ट्र राज्याला जोडल्या गेल्याने दोन्ही राज्यांतील जनतेचा प्रवास सर्रास परिवहन मंडळाच्या बसमधूनच होत असतो. बेळगाव आगारतून बेळगाव-कोल्हापूर बसेस दर दहा पंधरा मिनिटांनी धावत असतात. त्यामुळे बेळगाव विभागाला महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून दररोज 40 टक्के उत्पन्न मिळत असते. मात्र आता बेळगावा बसस्थानकातून महाराष्ट्रात धावणाऱया बसेस बंद असल्याने बेळगाव आगाराच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी उत्पन्नही थांबले आहे.
आंतरराज्य बससेवेला परवानगी दिली असली तरी कर्नाटक महाराष्ट्र बससेवा बंद आहे. याचा अधिक फटका बेळगाव विभागाला बसत आहे. सध्या बसस्थानकातून जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासाला सुरुवात झाली असली तरी प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आगारातून स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या बसेस धावत असल्याने प्रवासी संख्येबरोबर उत्पन्नात हळूहळू वाढ होत आहे. मात्र अद्याप परिवहन निर्धारित उत्पन्न उद्दिष्टापासून दूरच आहे.









