बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीचे हवाई सर्वेक्षण केले. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर पूरग्रस्त जिल्ह्यांना आणखी निधी देण्यात येईल असे सांगितले.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यात मदत व बचावकार्य करण्यासाठी अधिकाऱ्यांना यापूर्वीच निधी देण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पुढील निधी जाहीर केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज गुलबर्गा आणि विजापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला.
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे विजापूर, गुलबर्गा, यादगीर, रायचूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे गुलबर्गा आणि विजापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पिके व घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान यावेळी एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पूर्ण अहवाल सादर केल्यानंतर केंद्रीय पथक तपासणी करेल, त्यासाठी किमान चार ते पाच दिवस लागू शकतात असे सांगितले.