भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटरसिक ज्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल सदैव ऋणी राहतील अशा काही व्यक्तिमत्त्वांमध्ये ज्यांची गणना होते त्यात दिलीप वेंगसरकर हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या मैदानाचा लौकिक आहे त्या ‘लॉर्ड्स’वर शतक झळकवावे अशी प्रत्येक फलंदाजाची इच्छा असते. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर या क्रिकेटच्या दैवतांनी लॉर्ड्सवर शतक झळकवावे म्हणून जंग जंग पछाडले. तिथेच दिलीप वेंगसरकर यांनी सलग तीनदा शतक झळकवावे हे त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरीशंकराचेच प्रतीक! कर्नल ही त्यांना लाभलेली उपाधी. नुकताच 64 वा वाढदिवस साजरा करताना वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून गुणवत्ता शोधण्याची मोहीम थंडावल्याबद्दल खंत व्यक्त केली. जगमोहन दालमियाँ बीसीसीआयचे अध्यक्ष असताना अशी गुणवत्ता शोध मोहीम राबविली गेली होती. त्याची जबाबदारी तेव्हा वेंगसरकर यांच्याकडे होती आणि जेव्हा ते निवड समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा या मोहिमेतून हेरलेल्या महेंद्रसिंग धोनी याला 21 वर्षाचा असूनही त्यांनी भारतीय संघात संधी दिली. सोबतीलाच युवा क्रिकेटर विराट कोहलीचाही शोध घेतला आणि त्याच्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची दारे उघडली गेली. गुणवत्तेचा शोध घेण्याचे काम हे अनुभवातून येत असते आणि भारतीय क्रिकेट संघासाठी 116 कसोटी सामने खेळलेल्या वेंगसरकर यांच्याइतका अनुभवी व्यक्ती त्या काळात जगमोहन दालमियाँ यांच्यासारख्या किमयागाराच्या नजरेतून चुकला असता तरच ते आश्चर्य ठरले असते. आपल्या अनुभवाच्या जोरावर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून वेंगसरकर यांनी जे निर्णय घेतले ते किती सार्थ होते हे आज इतक्या वर्षांनंतर सहज पटावेत! 2006 मध्ये निवड समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपला अधिकार एकहाती बजावला आणि धक्कादायकरित्या धोनी भारतीय संघाचा कर्णधार झाला. 116 कसोटय़ांच्या अधिकाराने ही शक्ती वेंगसरकरना बहाल केली होती. आज धोनी जगातील असा एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नावावर एकाचवेळी चॅम्पियन्स, टी 20 विश्वचषक, 50 षटकांचा एकदिवशीय विश्वचषक आणि कसोटी क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद नावावर आहे. धोनीच्या पाठोपाठ कर्णधार झालेल्या विराट कोहलीनेही त्याचेच अनुकरण करत ही परंपरा कायम ठेवली आहे. गुणवत्तेचा शोध आणि ती हेरण्याची एक दृष्टी असावी लागते. आपल्या कारकिर्दीच्या अंतिम काळात सुनील गावसकरने सचिनमध्ये आपला वारसा चालविण्याची गुणवत्ता असल्याचे जाहीर केले होते. पुढे सचिनने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेचा आणि आपला विक्रम मोडीत काढतील असे हे खेळाडू असल्याचा उल्लेख केला होता. भारतीय क्रिकेटला अशी परंपरा असली तरीही दूरदृष्टीच्या कर्नलने जी खंत व्यक्त केली त्याचा विचार आता बीसीसीआय आणि निवड समितीला करावा लागणार आहे. दालमियाँ यांच्यानंतर बीसीसीआयकडून गुणवत्तेचा शोध थांबला असल्याची ती खंत आहे आणि ते एका दूरदृष्टीच्या व्यक्तीचे म्हणणे आहे त्यामुळे ते गांभिर्यानेच घेतले पाहिजे. आजच्या भारतीय संघाकडे पाहिले की, जगातल्या कुठल्याही क्रिकेट रसिकाला ऑस्ट्रेलिया संघाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 1980 च्या दशकात ऑस्ट्रेलियाचा संघ घसरणीला लागलेला होता. ऍलन बॉर्डरने जबाबदारी घेतली पुढे1987 च्या विश्वचषकावर नाव कोरले आणि ती घसरण थांबवली. जागतिक क्रिकेटचा पुढच्या 17-18 वर्षांचा इतिहास हा त्याच्या उत्तराधिकाऱयांचा होता. मार्क टेलर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग या कर्णधारांनी ऑस्ट्रेलियाला जगज्जेता बनवला. 1999, 2003 आणि 2007 हे सलगचे विश्वचषक त्यांनी खिशात घातले. 2015 मध्येही आपला दबदबा कायम ठेवला. पण, आज त्याच ऑस्ट्रेलियाची अवस्था अत्यंत दयनीय म्हणावी अशी झाली आहे. ऑस्ट्रेलिया जेव्हा जगज्जेता बनला होता तेव्हा भारत पुन्हा एकदा अस्तित्वासाठी धडपडत होता. 1994 साली कपिलदेवने निवृत्ती घेतली. 96 ला सचिनचे युग सुरू झाले. पाठोपाठ नव्या सहस्रकात राहुल द्रविड, सौरभ गांगुली, कुंबळे, श्रीनाथ आदींचा उदय झाला. 2003 ला विरेंद्र सेहवाग लाभला. गांगुलीने भारताला यशाची चव चाखायला शिकवले. पण, दबदबा निर्माण व्हायला 2007 साल आणि धोनी युग उजाडावे लागले. वेंगसरकर यांच्या निवड समितीच्या आधी आणि अगदी आजही समितीत विभागवार कोटा असतो. पण, कोटय़ातही अनुभव विचारात घेतला जात नाही. परिणामी जसे ऑस्ट्रेलिया संघ गाजत असताना निवड समितीत कोण आहे याची दखल घ्यावीशी वाटत नव्हती तसेच आजच्या घडीला भारतीय निवड समितीचे झाले आहे. गुणवत्तेचा शोध दालमियाँच्या नंतर थांबला तो थांबलाच. पण गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्वतःच अंतर्गत वाद आणि विरोधात गुरफटले गेले आहे. गेल्या पाच सहा वर्षांतील घडामोडींमुळे इथे प्रशासक नेमायची नामुष्कीही ओढवली गेली आहे. त्या प्रशासकाच्या अखत्यारित कारभार हंगामी अध्यक्ष म्हणून सौरभ गांगुलीकडे सोपवला गेला आणि आता ती निवड कायम झाली आहे. आता पुन्हा शंभर कसोटीचा अनुभव असणारी व्यक्ती अध्यक्षपदी बसली आहे. मध्यंतरी मंडळाने तांत्रिक समिती नेमली. त्यात सचिन, सौरभ आणि द्रविडला नेमले होते. पण, ही निवड नेमकी कशासाठी आहे हे या तिघांनाही शेवटपर्यंत समजले नाही. त्यांनीही तसे बोलून दाखविले आहे. योगायोगाने म्हणा किंवा कसेही म्हणा दालमियाँचा शिष्य असलेला सौरभ गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष आहे आणि नियतीने कर्नलची खंत दूर करायची आणि त्याच्या दूरदृष्टीची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी या महान खेळाडूवर आणली आहे. त्याने ती सार्थ करावी आणि वेंगसरकर यांची खंत दूर करावी हीच क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे.
Previous Articleतेजी टिकवण्यात बाजाराला अपयश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








