17 वर्षांपासून जंगलात राहणे भाग
मागील 17 वर्षांपासून जंगलात स्वतःच्या अत्यंत जुन्या ऍम्बेसिडर कारमध्ये जगणाऱया एका व्यक्तीची ही कहाणी आहे. कर्नाटकातील या व्यक्तीचे नाव चंद्रशेखर गौडा असून त्यांचे वय 56 वर्षे आहे. कर्ज न फेडता आल्याने त्यांना स्वतःची 1.5 एकर जमीन गमवावी लागली, त्यानंतर ते घनदाट जंगलात स्वतःच्या कारमध्येच राहू लागले.
जंगलात उभी कार

चंद्रशेखर दीर्घकाळापासून दक्षिण कन्नड जिल्हय़ातील सुलियानजीक घनदाट जंगलात राहत आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलात सुमारे 3-4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यानंतर त्यांची जुनी ऍम्बेसिडर कार उभी असल्याचे दिसून येते. अजब बाब म्हणजे या कारमधील रेडिओ अद्याप कार्यरत आहेत.
सोबत केवळ दोन गोष्टी
जंगलात राहिल्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागला आहे. चंद्रशेखर यांच्याकडे कपडय़ांचे दोन जोड आणि पायात चप्पल इतक्याच गोष्टी आहेत. जंगलाच्या हिशेबानुसार जगणे ते आता शिकले आहेत.
कर्ज फेडता न आल्याने…

चंद्रशेखर यांची गावात 1.5 एकर जमीन होती. 2003 मध्ये त्यांनी एका बँकेकडून 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पण अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना कर्ज फेडता आले नाही. अशा स्थितीत बँकेने त्यांच्या शेतजमिनीचा लिलाव केला. या घटनेने चंद्रशेखर मनाने कोलमडून गेले आणि त्यांचे पूर्ण जीवन बदलले.
कुटुंबीयांशी भांडण
चंद्रशेखर यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते, याचमुळे त्यांनी स्वतःची ऍम्बेसिडर कार घेत बहिणीच्या घरी धाव घेतली. पण काही दिवसांनी बहिणीच्या कुटुंबाशी खटके उडू लागले. यामुळे त्यांनी एकटेच राहण्याचा निर्णय घेत कार चालवत दूर जंगलात पोहोचले.
असा होतो उदरनिर्वाह
चंद्रशेखर 17 वर्षांपासून कारमध्ये एकांतात जगत आहेत. नदीत ते आंघोळ करतात. जंगलातील सामग्रीची विक्री करून ते तांदूळ, साखर अन् सामग्री खरेदी करतात. स्वतःची जमीन परत मिळावी ही एकच त्यांची इच्छा आहे. याकरता त्यांनी सर्व दस्तऐवज सांभाळून ठेवले आहेत.









