कराड / प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील तांबवे गावातील शिवारात आज दुपारी बाराच्या सुमारास बिबट्याचा मुक्त वावर पहायला मिळाला. एका जनावरांच्या शेडमधून आत डोकावत असतानाच शेतकर्याला बिबट्या दिसला आणि त्याची पाचावर धारण बसली. मनुष्याच्या सुगाव्यामुळे बिबट्या नजीकच्या उसाच्या शेतात निघून गेला. या घटनेची खबर वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तांबवे गावातील आप्पासाो पाटील हा शेतकरी सकाळी सातच्या सुमारास जनावरांच्या शेडमध्ये असताना बिबट्या शेडमध्ये डोकावत असल्याचे त्याने पाहिले आणि त्याची पाचावर धारण बसली. त्याने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने शेडाच्या पाठीमागील उसाच्या शेतात जाऊन थांबला. त्यावेळी आप्पासाो पाटील यांनी मोबाईल कॅमेर्यात बिबट्याचे चिचित्रकरण केले.
तांबवे गावात आठवड्यात चारवेळा बिबट्यांचे दर्शन
तांबवे परिसरात चार बिबट्यांचा वावर आहे. मागील आठवड्यात तीन ठिकाणी शेतकर्यांना बिबट्यांचे दर्शन झाले आहे. एका बिबट्याने सलग दोन दिवसात एकाच शेतकर्याच्या दोन शेळ्या ठार केल्या आहेत. शेळी मालकावरही हल्ल्याचा देखील प्रयत्न बिबट्याने केला. मात्र, शेतकरी सुदैवाने बचावला. बिबट्याच्या पंजाचा तडाखा बसल्याने शेतकर्याच्या हाताला जखम झाली आहे. नर-मादी बिबट्यांची जोडी आणि आणखी दोन, असे चार बिबटे तांबवे गावातील शिवारात फिरताना दिसत आहेत.
नागरी वस्तीतही बिबट्याचे दर्शन
मागील शनिवारी तांबवे बाजारपेठेपासून शंभर मीटर अंतरावरील करपे वस्तीवर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी करपे वस्तीकडे धाव घेतली होती. नागरीकांचा सुगावा लागताच बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली.
वनविभागाचा अजब कारभार
वनविभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी तांबवे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली. परंतु, एखाद्या नागरीकावर हल्ला केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, असे वनविभागाच्या कर्मचार्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तांबवे ग्रामस्थ संतापले आहेत. बिबट्याने एखाद्याचा बळी घेतल्यानंतरच वनविभागाला जाग येणार आहे का, असा सवालही तांबवे ग्रामस्थांनी केला आहे.