प्रतिनिधी/ कराड
कराड उपविभागीय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. अशा चार सराईत गुंडांना कराड उपविभागातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांनी दिली.
कराड शहर, कराड तालुका व उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अंतर्गत हद्दपारीचे प्रस्ताव करण्यात आलेले होते. त्याबाबत तत्कालीन धडाकेबाजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी चौकशी करुन उपविभागीय दंडाधिकारी, कराड यांचेकडे अहवाल सादर केलेले होते.
त्याप्रमाणे कराड शहर, कराड तालुका व उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (रा. हजारमाची), अमित हणमंत कदम (रा. विद्यानगर), तुकाराम ऊर्फ बाबा पंडित जगताप (रा. कोडोली) अनिकेत रमेश बाबर (रा. उंब्रज) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. या कारवाईची अंमलबजावणी नुकतीच झाल्याचे रणजीत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान आणखी काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उपविभागात कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. लवकरच आणखी काही प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.







