प्रतिनिधी/ कराड
माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपालिकेच्या वतीने शहरात पाच ठिकाणी हवा प्रदूषण मापन यंत्र (एम्बिएन्ट एअर क्वालिटी मॉनिटरिंग मशीन) बसविण्याचा शुभारंभ दत्त चौक येथे मान्यवरांच्या उपस्थित झाला. एकुण पाच ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात येणार असून यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेची माहिती तातडीने मिळणार आहे.
दत्त चौकात झालेल्या शुभारंभास ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, गटनेते सौरभ पाटील, सुहास जगताप, प्रीतम यादव, अभियंता ए. आर. पवार, सौ विद्या पावसकर, एन्व्हायरो प्रेण्डस् क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद, देवानंद जगताप, चंदू जाधव, प्रकाश खोचीकर, रमेश पवार आदी उपस्थित होते.
हे यंत्र शहरातील कृष्णा नाका, विजय दिवस चौक, दत्त चौक, चावडी चौक, पोपट भाई पेट्रोल पंप या ठिकाणी लावण्यात आले आहे. शहरात वाढणारी वाहन संख्या व त्यामुळे होणारे वायू प्रदूषण वाढून त्याचा परिणाम मनुष्याच्या श्वसनावर होतो. याद्वारे हवेतील धूलिकण व घातक वायू म्हणजे सल्फर ऑक्सिड व नायट्रोजन ऑक्सिड तसेच नाका वाटे जाणारे धूलिकण व तरंगणारे धूलिकण याचे मोजमाप केले जाते, असे प्रा. काशिद यांनी सांगितले. या यंत्राचे रिपोर्ट लॅबमध्ये तपासले जातात. त्यानंतर हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळते.








