प्रतिनिधी /कराड :
कोरोना महामारीच्या काळात कराडमध्ये उपचारासाठी जिल्हय़ातून रूग्ण येत आहेत. त्यामुळे कोविड हॉस्पिटलमध्ये स्थानिक रूग्णांना बेड मिळत नाहीत. त्रास होत असलेल्या रूग्णांना तातडीने व्हेंटिलेटर न मिळाल्याने आतापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दक्ष कराडकर गुप व नागरिकांच्या वतीने प्रांत तथा इन्सिडेंट अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
ग्रुपचे प्रमोद पाटील, साबिर मुल्ला, जाबीर वाईकर, अजित पाटील, तनवीर मुल्ला, फिरोज मुल्ला आदींनी हे निवेदन दिले. यात म्हटले आहे की, सर्वत्र कोरोना महामारीचे संकट सुरु आहे, अशा स्थितीत कराड तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल व एरम हॉस्पिटल मिळून जवळजवळ 45 से 50 व्हेंटिलेटर आता कोव्हिड पेशंटसाठी वापरत आहेत. कराडमधील या तिन्ही हॉस्पिटलमध्ये फक्त कराड तालुक्यातीलच नव्हे इतर तालुक्यासह परजिह्यातून व पेशंट उपचारासाठी दाखल होत आहेत.
यामुळे गत 10 दिवसात व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यामुळं फवत कराड शहरातील 6 जण मरण पावले. ही बाब गंभीर आहे. आपण कराड तालुका कोव्हिड इन्चार्ज म्हणून या सर्व घटना गांभीर्याने घेत नाही. अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांत आहेत. कारण हे रोखण्यासाठी गेल्या महिन्याभरात काही प्रयत्न झाले असते तर या रुग्णांचा जीव वाचवता आला असता. सध्या कराड तालुक्यात रोज 60 ते 70 रुग्ण तसेच कराड शहरात 20 ते 25 जण अशी वाढत आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे जर रुग्ण मृत्यूमुखी पडत असतील तर आपल्या उपाययोजना कमी पडत आहेत असच आता दिसत आहे.
हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत की नाही याची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी आपण यंत्रणा उभारली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना बेड उपलब्ध आहेत की नाही हे पाहण्यासाठी बाधित पेशंटना घेऊन सगळीकडे धावाधाव करावी लागत आहे. बाधित पेशंट सोबत असल्यामुळे कोरोना व्हायरस प्रसार होऊ शकतो. कराड शहरातील नागरिकांच्या महात्मा फुले आरोग्य दायी योजना संबंधी तसेच हॉस्पिटल बिलासंबधी ज्या काही तक्रारी आहेत, त्याकडे पण आपण दुर्लक्ष करत आहात असे दिसून येत आहे. हे आपलं अपयशच समजावे का?.
यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत व व्हेटिलेटरअभावी एका जरी रूग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाला तर आपणास जबाबदार धरले जाईल. याबाबत योग्य ठिकाणी न्याय मागितला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्यमंत्री यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे.









