प्रतिनिधी/ बेळगाव
अनारोग्याची, चिंतेची, क्लेशाची, काळोखी दूर करुन आरोग्याचा, ज्ञानाचा, समृध्दीचा प्रकाश सर्वोत्र नांदावा या भावनेने कपिलेश्वर मंदिर समितीतर्फे मंदिर आणि तलावाच्या परिसरात लक्षदीपोत्सव करण्यात आला. या दीपोत्सवाने मंदिराचा परिसर उजळून निघाला. पणत्यांच्या सिग्ध प्रकाशामध्ये तलावातले पाणी चमचम करु लागले तर मंदिराच्या परिसराला वेगळेच चैतन्य प्राप्त झाले.
कपिलेश्वर मंदिर समितीतर्फे दरवषी कार्तिकी अमावस्येनिमित्त दीपोत्सव करण्यात येतो. यंदा सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य आणि मनपाच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी मंदिर समितीतर्फे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री व उपाध्यक्ष सतीश निलजकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर समिती सदस्य राकेश कलघटगी, विवेक पाटील, राजू भातकांडे, विकास शिंदे, प्रसाद बाचोळकर, राहुल कुरणे, प्रथमेश कावळे, अभय लगाडे, आनंद बाळेकुंद्री, दौलत जाधव, आकाश व गणेश देवर, सचिन आनंदाचे उपस्थित होते.
नागराज कट्टी यांनी पौरोहित्य केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन अभिजित चव्हाण यांनी केले. मंदिर समिती सदस्य, कपिलेश्वर बाल संस्कार वर्गाची मुले, महिला व पुरूष सेवेकरी, यांनी लक्षदीपोत्सवासाठी पणत्या प्रज्वलीत केल्या. सायंकाळी भगवान शंकर, विघ्नहर्ता गणेश, छत्रपती शिवराय, राणी चन्नम्मा यांच्या जीवनावर आधारीत लेझर शोही दाखविण्यात आला.
चौकट करणे
या निमित्ताने धीशक्ती ग्रुपच्या महिलांनी मंदिर परिसरात भव्य अशा रांगोळय़ा रेखाटल्या. प्रिया वेर्णेकर हिने रांगोळीच्याव्दारे विठ्ठलमूर्ती तर साक्षी यलजी हिने जयमल्हारची रांगोळी रेखाटली. या दोन्ही अप्रतिम अशा कलात्मक रंगावलीचे उपस्थितांनी कौतुक केले.









