अथणी तालुक्यातील हल्ल्याळ येथील कृष्णा नदीतील घटना : एनडीआरएफ, अग्निशमन दलाकडून शोध सुरू

वार्ताहर /अथणी
हल्ल्याळ (ता. अथणी) येथील कृष्णा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील चौघे सख्खे भाऊ वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाच्यावतीने चौघा भावांचा नदीपात्रामध्ये शोध घेतला जात आहे. परशराम गोपाळ बनसोडे (वय 36), सदाशिव बनसोडे (वय 24), दऱयाप्पा बनसोडे (वय 22), शंकर बनसोडे (वय 18) अशी वाहून गेलेल्या चौघा भावांची नावे आहेत. दरम्यान, चौघा भावांच्या शोधासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एनडीआरएफच्या पथकाची नियुक्ती केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हल्ल्याळ येथे गुरुवारी उरुस असल्याने पारंपरिक पद्धतीप्रमाणे या गावातील नागरिक कपडे धुण्यासाठी नदीकाठावर जातात. त्यानुसार बनसोडे कुटुंबातील हे चौघे सख्खे भाऊ कपडे धुण्यासाठी नदीकाठावर गेले होते. यावेळी सदाशिव बनसोडे हा कपडे धूत असताना त्याचा पाय घसरल्याने तो नदीच्या वेगवान प्रवाहात वाहत गेला. त्यामुळे त्याच्या शोधासाठी त्याचे भाऊ परशराम, दऱयाप्पा व शंकर हे नदीपात्रात उतरले. मात्र नदीच्या वेगवान प्रवाहामुळे ते तिघेदेखील नदीमध्ये वाहून गेले. ही घटना लक्षात येताच नदीकाठी त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दुंडाप्पा कोमर, डीएसपी एस. व्ही. गिरीष, सीपीआय शंकरगौडा बसगौडर, पीएसआय कुमार हडकर यांच्यासह अथणी अग्निशमन दल, एनडीआरएफची तुकडी तसेच मासेमारी करणाऱयांनी घटनास्थळी धाव घेत वरील चौघांचा शोध सुरू केला आहे. मात्र नदीचा प्रवाह वेगवान असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत.
शोधकार्याप्रसंगी नदीच्या दोन्ही काठावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.









