बॉलिवूड गायिका कनिका कपूरने अखेर कोरोना विषाणूवर मात केली आहे. 20 मार्च रोजी तिला लखनौच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून 5 वेळा तिचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण सहावा अहवाल निगेटिव्ह आल्यावर रविवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु अद्याप तिला 10 दिवस घरातच क्वारेंटाईनचे पालन करावे लागणार आहे.
कनिकाने कोरोनावर मात केली असली तरीही तिच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. लंडनहून परतल्यावर तिने स्वतःला विलग न करता पाटर्य़ांमध्ये भाग घेतला होता. विमानतळावरही तिने चाचणी टाळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिच्या विरोधात लखनौच्या पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कनिका 9 मार्च रोजी लंडन येथून परतली होती. तसेच त्यानंतर ती लखनौच्या एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होती. या परिसरात अन्य 700 कुटुंबांचे वास्तव्य होते. याचबरोबर तिने ताज हॉटेलमध्ये आयोजित पार्टीत भाग घेतला होता. 15 मार्च रोजी काँग्रेसचे माजी खासदार जितिन प्रसाद यांचे सासरे आदेश सेठ यांनी याचे आयोजन केले होते. या सोहळय़ात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, त्यांचे पुत्र दुष्यत सिंग, उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. या सर्वांना विलगीकरण प्रक्रियेस तोंड द्यावे लागले होते. या सर्वांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.









