ऑनलाईन टीम / पुणे :
सध्याच्या राजकारणात काय होत आहे?, कधी एकत्र न येणारे एकत्र येतायंत, त्यामुळे मी निरीक्षकाची भूमिका घेतली आहे. सध्याची राजकीय स्थित्यंतरे तरुण पिढी पहात आहे. ही राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडणारी आहे, असे सांगत माजी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मत व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे पाचव्या युवा संसदेचे उद्घाटन राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान खासदार गजानन किर्तीकर, डॉ.श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार राहुल कुल, पत्रकार महेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत जगताप, युवा क्षेत्रात रमणप्रीत यांना आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक, पत्रकार, युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आजच्या व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. प्रस्थापितांच्या राजकारणात वेगळे वलय होते. त्यानंतर युवकांची भरारी आणि आता आजचे राजकारणच युवकांनी ताब्यात घेतले आहे. युवक उद्याचे भविष्य आहेत, हे वाक्य केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता. त्यांना चांगल्या संधी मिळायला हव्यात. चांगले युवा निर्माण होण्याकरीतामहाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्या. आम्ही निवडणुकांना भित नाही, असे म्हणणा-यांनी महाविद्यालयीन निवडणुकांवर बंदी घालणे चुकीचे आहे. आम्ही अशाच निवडणुकांमधून तयार होत पुढे आलो आहोत.









