आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी
पाणी हे आपले जीवन आहे. मनुष्यासाठी पाणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पण कणबर्गी येथील नागरिक पाणी टंचाईमुळे तहानेने व्याकुळ झाले आहेत. या गावात गेल्या नऊ दिवसांपासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा करावी लागत आहे. प्रशासनाचे गावच्या पाणीपुरवठय़ाकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. अधूनमधून परतीच्या पावसानेही हजेरी लावली आहे. उन्हाचे चटके बसू लागले आहेत. याच्या प्रारंभीच बेळगाव शहराच्या अगदी लगत असलेल्या कणबर्गी गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. घरासमोर असलेल्या नळाला पाणी येत नसल्यामुळे महिलावर्गाला भटकंती करावी लागत आहे. शेत-शिवारातील विहिरी, खासगी कूपनलिका तसेच पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे या गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
हिडकल डॅममधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारी पाईपलाईन कणबर्गी गावातूनच येते. पूर्वी या मुख्य पाईपलाईनला व्हॉल्व बसवून गावासाठी पाणी पुरविले जात होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून गावच्या बसवनकोळ डोंगरातून फिल्टरच्या युनिटचे पाणी गावाला सोडण्यात येते. मात्र, हे पाणी नळाला कधी येते, याचा काहीच पत्ता लागत नाही. यामुळे महिलावर्गाला पाण्यासाठी सकाळपासूनच वणवण फिरावे लागत आहे. गावातून गेलेल्या पाईपलाईनचे पाणी कणबर्गी गावाला पुरविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
हिडकल डॅमचे पाणी बसवनकोळ डोंगरातील टाकीमध्ये सोडण्यात आले आहे. या ठिकाणी पाणी फिल्टर करून ज्योतिर्लिंग गल्लीच्या कोपऱयावर असलेल्या पाण्याच्या टाकीत सोडण्यात येते व ते पाणी गावाला पुरविण्यात येते. मात्र, गेल्या नऊ दिवसांपासून गावात पाणी आले नसल्याने खासगी कूपनलिका तसेच टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे.
तुम्मरगुद्दी येथून येणाऱया पाईपलाईनचे पाणी गावाला देण्यासाठी महानगरपालिकेचे तत्कालिन महापौर शिवाजी सुंठकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. पण सध्या या पाईपलाईनचे पाणी थेट गावाला पुरविण्यात येत नसल्यामुळे पाणीसमस्या अधिक भेडसावू लागली आहे.
गावात ज्योतिर्लिंग गल्लीमध्ये सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीचे पाणी केवळ घरगुती वापरासाठी वापरण्यात येते. गावालगतच शिवारात संजय इनामदार यांची बाराबावडी ही विहीर आहे. या विहिरीचे पाणी पिण्यासाठी नागरिक पूर्वीपासून वापरतात. सध्या नळाला पाणी येत नसल्यामुळे बरेच लोक या विहिरीचा वापर करू लागले आहेत.
गावात पाणीसमस्या निर्माण झाली असल्याने अशा काळात कूपनलिकेचा उपयोग होऊ शकतो. मात्र, गावात असलेल्या 20 ते 25 कूपनलिकांपैकी सध्या केवळ दोन ते तीनच कूपनलिका चालू आहेत. या कूपनलिकांचीही दुरुस्ती होणे गरजेचे आहे. ज्योतिर्लिंग गल्ली येथील मुतगेकर यांच्या खासगी कूपनलिकेचे पाणी काही महिला भरत आहेत. पाणीसमस्या निर्माण झाली असल्यामुळे थोडय़ा प्रमाणात का होईना, आपल्या खासगी कूपनलिकेचा आधार गावकऱयांना मिळावा या हेतूने मुतगेकरही दातृत्वाच्या भावनेतून पाणी देत आहेत.
दोन महिन्याला 280 रुपये पाणीपट्टी यापूर्वी भरण्यात येत होती. या पाणीपट्टीमध्ये वाढ करून हीच पाणीपट्टी दोन महिन्याला 350 रुपये इतकी करण्यात आली आहे. पाणीपट्टी भरूनही आमच्या गावाला सुरळीत पाणीपुरवठा नाही, अशी माहिती किसन सुंठकर यांनी दिली आहे. पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी पाणी अपुरे पडत असल्यामुळे अनेक नागरिक टँकरच्या पाण्याचा आधार घेऊ लागले आहेत. एका टँकरला 400 ते 500 रुपये त्यांना द्यावे लागत आहेत. यामुळे पाणीपट्टी भरूनही आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करण्याची वेळ आली आहे.
गावात निर्माण झालेल्या पाणी समस्येबाबत माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना रविवारी सकाळी फोनद्वारे संपर्क साधला व गावातील नागरिकांचे पाण्याविना होणारे हाल, याबाबत माहिती दिली. त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा महिलांना घेऊन घागर मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामस्थांच्यावतीने त्यांनी सदर अधिकाऱयांना दिला आहे.









