तिघेजण गंभीर जखमी : कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात, खानापूर पोलिसात नोंद
वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबीहून गोव्याकडे जाणाऱया कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका वळणावर झाडाला जोराची धडक दिल्याने कारमधील एक महिला जागीच ठार तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार दि. 19 रोजी सायंकाळी पाच वाजता कणकुंबीजवळ घडली.
अपघातात जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव गुलाबी पांडुरंग गावस (वय 65, मूळ गाव पारवाड, सध्या स्थायिक म्हापसा गोवा) असे असून कारमधील विश्वधारा विठ्ठल पारवाडकर (वय 50), रेश्मा महादेव गावस (वय 40) आणि महादेव अप्पा गावस (वय 42) सर्वजण मूळ गाव पारवाड, सध्या स्थायिक गोवा हे सर्व गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी विश्वधारा विठ्ठल पारवाडकर यांची प्रकृती गंभीर असून कारमध्ये असलेली कुमारी अन्वेशा ही मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
कारमधील सर्वजण मूळचे पारवाड गावचे असून सध्या व्यवसायानिमित्त होंडा, म्हापसा आदी ठिकाणी गोव्यात स्थायिक झाले आहेत. पारवाड येथे आपल्या मूळगावी मंगळवार दि. 18 रोजी ग्रामदेवता श्री सातेरी आणि केळबाई देवी या देवस्थानचा वार्षिकोत्सव कार्यक्रम होता. त्यानिमित्त हे सर्वजण गावाकडे आले होते. मंगळवारी मुक्काम करून बुधवारी सर्वजण आपल्या कारने गोव्याला जाण्यासाठी निघाले. मात्र, कणकुंबीपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर म्हणजे मनोहर धाब्याजवळ असलेल्या एका वळणावर भरधाव चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने कारगाडी सरळ झाडाला आदळली. त्यामध्ये गुलाबी गवस यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सदर अपघाताची माहिती कणकुंबी चेकपोस्टवरील पोलिसांनी खानापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालीहाळ, जांबोटी ओपीचे हवालदार सनदी व इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूरला पाठविण्यात आला तर जखमींना रुग्णवाहिकेतून बेळगावच्या केएलई हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. घटनास्थळी पारवाड ग्रामपंचायत अध्यक्ष भिकाजी गावडे व कणकुंबी, पारवाड येथील स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. उत्तरीय तपासणीनंतर गुलाबी गावस यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. खानापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.









