एका अधिकाऱयाचा समावेश : संपर्कात आल्याने अन्य पोलिसांमध्ये घबराट
कणकवली
कणकवली पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱयांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. यात एका अधिकाऱयाचाही समावेश आहे. या वृत्ताला तालुका आरोग्य विभाग व पोलीस या दोन्ही विभागांच्या जबाबदार अधिकाऱयांनीही दुजोरा दिला आहे. यातील काही पोलीस हे अन्य पोलिसांच्याही संपर्कात आल्याने सहकारी पोलिसांमध्येही घबराट पसरली आहे. दरम्यान, यापूर्वीही एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, तो सुट्टीवरून येथे आल्यानंतर ‘क्वारंटाईन’ होता, असेही अधिकाऱयांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील पोलीस अधिकारी व एक कॉन्स्टेबल सुट्टी घेऊन आपापल्या गावी गेले होते. पुढे ‘डय़ुटी’वर ‘जॉईन’ होण्यासाठी आल्यानंतर दोघांनीही ‘रॅपीड टेस्ट’ केली, ती ‘निगेटिव्ह’ आली होती. यादरम्यान दोघेही ‘क्वारंटाईन’ होते. पुढे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या सूचनेनुसार दोघांनीही पुन्हा एक ‘टेस्ट’ केली, त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे.
उर्वरित दोन पोलिसांपैकी एकजण खारेपाटण व दुसरा फोंडाघाट चेकपोस्ट येथे डय़ुटी बजावत होता. यातील एकाला ‘डय़ुटी’दरम्यानच लक्षणे जाणवल्याने त्याने चेकपोस्टवरच ‘स्वॅब’ टेस्ट दिली होती. तर चेकपोस्टवर ‘डय़ुटी’ बजावल्याने अन्य एका पोलिसानेही ‘स्वॅब टेस्ट’ दिली होती. दोघांचेही अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.
अन्य पोलिसांमध्ये घबराट
‘कोरोना’ग्रस्त पोलिसांपैकी दोघेजण ‘होम क्वारंटाईन’ होते. मात्र, ‘डय़ुटी’ बजावताना ‘कोरोना’ग्रस्त झालेले दोन्ही पोलीस हे कामानिमित्त अन्य पोलीस कर्मचाऱयांच्याही काही प्रमाणात संपर्कात आले आहेत. परिणामी उर्वरित पोलिसांमध्येही घबराट पसरली आहे. दरम्यान, ‘कोरोना’ग्रस्त पोलिसांच्या संपर्कातील अन्य पोलिसांची माहिती घेण्यात येत असून त्यांच्या ‘स्वॅब टेस्ट’ घेण्यात येणार आहेत. अन्य पोलीस कर्मचाऱयांना ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जबाबदार पोलीस अधिकाऱयाने सांगितले.









