जिल्हाधिकाऱयांना निवेदन : अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा विघटनासाठी गावाला लागूनच जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या जागेजवळ धान्याचे गोडावून, घरकुल वृद्धाश्रम, आश्रयनगर यासह नागरी वसाहत आहे. तेव्हा त्या ठिकाणी तो कचरा डेपो करू नये, या मागणीसाठी बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी आणि पंच कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
बेनकनहळ्ळी, कल्लेहोळ आणि सुळगा-हिंडलगा अशी तीन गावची हद्द या जागेला लागूनच आहे. नागरी वसाहतीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण जिल्हय़ातील रेशन दुकानांना धान्य पुरवठा करणारे गोडावूनदेखील जवळच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणीच हा कचरा प्रकल्प ग्राम पंचायतच्या माध्यमातून होत आहे. त्याला आमचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कचरा डेपो करण्यास आमचा विरोध राहील. तेव्हा तातडीने संबंधित ग्राम पंचायत अधिकाऱयांना याबाबत सक्त ताकीद करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी तालुका म. ए. समितीचे युवा अध्यक्ष संजय मंडलिक, ग्रा. पं. सदस्य महेश कोलकार, कल्लाप्पा देसूरकर, भरमा कोलकार, गणेश सुतार, कलावती देसूरकर, शिल्पा मुंगळीकर, मीनाक्षी पाटील, भरमा देसूरकर, रामा पाटील, महेश पाटील, ईश्वर पिसाळे, युवराज देसूरकर, बाळू देसूरकर, लक्ष्मण खांडेकर, मोनाप्पा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









