प्रतिनिधी /म्हापसा
पालिका मंडळाला विश्वासात न घेता कचरा संकलन कंत्राटदाराला परस्पर मुदतवाढ दिल्याच्या मुद्यावरून सत्ताधारी गटासह सर्व नगरसेवकांनी आज म्हापसा नगराध्यक्षांना धारेवर धरले. विचारविनिमय केल्यानंतर पालिका मंडळाने 13 सप्टेंबरपासून कचरा संकलन कंत्राटदाराला एक महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी सकाळी नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची सर्वसाधारण बैठक पालिका सभागृहात झाली. बैठकीतील वादाला सुरुवात नगरसेवक प्रकाश भिवशेट तसेच नगराध्यक्षांमध्ये गट बैठकीतील तयार केलेल्या अहवालावरून झाली. अहवाल व्यवस्थित तयार केला जात नसल्याचा आरोप भिवशेट यांनी केला. म्हापसा पालिकेकडून प्रभाग 1 ते 10 मधील कचरा गोळा करण्याचे काम खासगी कंत्राटदारामार्फत केले जाते. कंत्राटदाराला दिलेली मुदत संपुष्टात आल्याने नगराध्यक्षांनी त्याला 10 लाख रुपयांच्या अतिरिक्त रक्कमेवर मुदत वाढ दिली. या मुदतीस सत्ताधारी गटातील नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी हस्तक्षेप घेतला. एवढय़ा मोठय़ा रक्कमेची मुदतवाढ ही पालिका मंडळाला विश्वासात न घेतल्याबद्दल त्यांनी यावर हरकत घेतली. तसेच नगरसेवक स्वप्नील शिरोडकर यांनी देखील ही मुदतवाढ रद्द करण्याची मागणी केली.
चतुर्थीच्या काळात बाजारातील सोपोच्या मुद्यावरूनही चर्चा रंगली. गेल्या महिन्यात मंडळाच्या विशेष बैठकीत चतुर्थीतील सोपो मंडळाकडून गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदाराकडूनच सोपो गोळा केल्याने साईनाथ राऊळ यांनी हरकत घेतली.
चर्चेनंतर प्रभाग 1 ते 10 मधील कचरा कंत्राटदाराला 13 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. तसेचव ाढीव कालावधीपूर्वी कंत्राटदाराने कचऱयाचे संकलन केलेल्या कालावधीसाठी पालिका निधीतून कंत्राटदाराला देय देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मतदानाने मंजूर करण्यात आला असून 4 नगरसेवकांनी त्यास विरोध केला.









