कोरोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकारचा निर्णय
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठय़ा संख्येने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात आलेले डॉक्टर, कर्मचाऱयांचा अवधी वाढविण्याचा आदेश वैद्यकीय मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची भीती असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील विविध रुग्णालयात नेमण्यात आलेल्या कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱयांचा अवधी 6 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गेल्या आठवडय़ात सरकारचे मुख्य कार्यदर्शींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. बैठकीत कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील विविध रुग्णालयात नेमलेले डॉक्टर आणि कर्मचाऱयांचा अवधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मंत्री सुधाकर यांच्या सुचनेनुसार हा आदेश देण्यात आला असून 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत अवधी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.









