वाहन चालक, सफाई कामगारांकडून सखोल चौकशीची मागणी ः अन्यथा उपोषण करण्याचा इशारा
वार्ताहर/ शिखर शिंगणापूर
जिल्हा परिषद सातारा, मार्फत कंत्राटी वाहन चालक, सफाई कामगार भरती यशोधरा महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या नाशिक यांचे मार्फत ठेकेदार पद्धतीने करण्यात आली आहे. शासन नियमानुसार सर्व वेतन रक्कम कामगारांचे नावे काढली जाते. मात्र कामगारांना पगार मिळत नसल्याची तक्रार असून याबाबत उपोषण करणार असल्याचीं लेखी निवेदन व माहिती अंकुश नारायण पवार यांनी दिली आहे.
यशोधरा महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या नाशिक यांच्याद्वारे कंत्राटी वाहन चालक यांचे वेतन जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या नियमाने होत नाही. कंत्राटी वाहन चालक यांचे मूळ वेतन 9664 रुपये व विशेष वेतन 1092 रुपये असे एकूण मूळ वेतन 10,7,56 रुपये असे आहे. यामध्ये घरभाडे भत्ता 538 रुपये, बोनस 896 रुपये असे एकूण नेट वेतन 12,1,90 रुपये होतात. ईपीएफ 1398 रुपये, इसआय 350 रुपये असे एकूण ग्रॉस 13,9,38 रुपये वेतन होते. यामध्ये अजून सर्विस चार्ज 1423 रुपये, जीसटी 2509 अशी रक्कम संस्थेला दिली आहे, असे सर्व मिळून एका कामगाराचे दर 17,8,69 रुपये प्रति महिना आहेत.
यशोधरा महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या नाशिक यांच्याकडून प्रत्येक कंत्राटी वाहन चालक यांचे वेतन महिन्याला फक्त 8291 रुपये जमा केले जात आहे. वास्तविक कर्मचाऱयांच्या पगारातून 12190 रुपये मधून कामगाराचा ईपीएफ 1291 रुपये व कामगारांकडून इसआय 81 रुपये वजा करून कंत्राटी वाहन चालक यांच्या बँक खात्यात 10,818 रुपये जमा झाले पाहिजेत पण संस्थेकडून फक्त 8,291 रुपये जमा केले जात आहे. यामध्ये संस्था 2,527 रुपये प्रत्येक कामगारांमागे अपहार करत आहे. संस्थेकडून ईपीएफ 1398 रुपये, कामगाराचा ईपीएफ 1291 रुपये, संस्थेकडून इसआय 350 व कामगारांकडून इसआय 81 रुपये जमा केले जात नाहीत तसेच वेतनाची स्लिप दिली जात नाही, पूर्ण पगार होत नाही आणि पगार वेळेवर होत नाही.
सदर संस्थेच्या कारभारात भ्रष्टाचार
ज्या कंत्राटी वाहन चालकांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले त्यांचेवर आता उपासमारीची वेळ आली आहे. संस्थेकडून कंत्राटी वाहन चालक यांची आणि जिल्हा परिषद सातारा यांची आर्थिक फसवणूक करून भ्रष्टाचार चालू असून कराराचे उल्लंघन चालू आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी त्याच बरोबर आरोग्य विभाग कंत्राटी चालक कामगारांचे पगार वेळेत व्हावेत, अशी मागणी केली असून या बाबत आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला आहे.









