सत्तेवर आलेले केंद्रातले असो किंवा देशातल्या कोणत्याही राज्यातील सरकार असो, मुंबईतल्या प्रश्नाचे भांडवल करून त्याचा राजकीय फायदा उठवला जातो. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची कथित मैत्रिण-प्रेयसी रिया चक्रवर्ती प्रकरणाचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये फायदा उठविण्यात आलाच आणि आता अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्याचा राजकीय फायदा केंद्र शासन आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्ष घेत आहेत हे अलीकडल्या काही घटनांची सुसंगती लावल्यावर स्पष्ट लक्षात येते. कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद टिपेला गेल्यानंतर कंगना प्रथमच बुधवारी मुंबईच्या अंगणात आली आणि या वादाने कहरच केला. मात्र, या सगळय़ाच्या मुळाशी गेल्यावर असे लक्षात येते, की एकमेकांच्या वक्तव्याचा हा वाद निव्वळ राजकीय फायद्यासाठी वाढविला गेला आणि त्याला अस्मितेचा रंगही चढविला गेला. कधीही, कोणत्याही वादाला अस्मितेचा रंग चढवला जातो, तेव्हा त्याचा भावनिक पातळीवर इश्यू होतो आणि त्याला सर्वाधिक बळी पडतात ते सामान्य लोक. त्यांना पडद्याआडचे राजकारण काहीच माहीत नसते. फक्त अस्मितेचा झेंडा कोणीतरी हातात दिलेला असतो, तोच त्यांना फडकविणे गौरवाचे वाटत असते. या गौरवाचा फायदा नेमका सगळे राजकीय पक्ष घेतात. कंगना राणावत प्रकरणात नेमके असेच घडले आहे. देशात अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण सुरू आहे. दुसरीकडे मोराच्या देखाव्याप्रमाणे सत्तेवरील प्रमुख मोराला दाणे घालून त्याची छबी देशभर झळकविण्यात यश मिळवित आहेत. लोकांचे मुख्य प्रश्नांपासून लक्ष कसे विचलित करायचे हे सत्तेवर कोणीही असो, त्यांना चांगलेच कळते. अर्थात यात शिवसेनाही मागे नाही. या प्रकरणाचा जेवढा फायदा घ्यायचा तेवढा घेण्याचे राजकारणही शिवसेना करते आहे. याचे प्रमुख कारण मुंबईची अस्मिता म्हणजे आपलीच अस्मिता अशी मानसिकता मराठी मुंबईकरांची बनविण्यात शिवसेना यशस्वी झाल्याने ‘मुंबई म्हणजेच शिवसेना’ हे समीकरण दृढ होत गेले. मुंबईतील आपल्या अस्तित्वाला धक्का लागू नये याची काळजी वारंवार शिवसेना घेत असते. मनसेने मराठीचा मुद्दा लावून धरला आणि शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी सत्तेसाठी गणित घातल्याने शिवसेना हिंदुत्वाशी फारकत घेत आहे, असा समज करत मनसेने हिंदुत्वाचा मुद्दाही उचलून धरला. या सगळय़ा पार्श्वभूमीवर कंगणा राणावत प्रकरणाकडेही बघावे लागत असल्याने तिने मुंबईवर टीका केल्यानंतर त्याचा फायदा शिवसेनेने घेतला नाही, तर नवलच म्हणावे लागेल. खरे तर 3 सप्टेंबरपासून कंगना आणि संजय राऊत यांच्यात एकमेकांवर आरोप करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर कोणीही मागे हटण्याचे चिन्ह दिसेना. त्यामुळे या वादाचे आता राजकीय संदर्भ स्पष्ट होत जात आहेत. कंगना भाजपधार्जिणी आहे हे आता लपून राहिलेले नाही. शिवसेनेसंदर्भातील बातमी ट्विटरवर शेअर करून ज्यावेळी कंगनाने संजय राऊत यांच्यावर टीका केली आणि मुंबईची ‘पाकव्याप्त काश्मीर’ अशी तुलना केली, तेव्हा भाजपचे आमदार राम कदम आदी मंडळी कंगनाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर उतरली होती. त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी कंगनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आणि मुंबईसंदर्भातील आदराची भावना व्यक्त केली. मुंबईचा हा आदरभाव खराही आहे पण यात राजकीय लोकांच्या भावना फार निर्मळ असतील, याची शाश्वती मात्र देता येत नाही. कारण इथेही भाजपची राजकीय नीती चांगलीच लक्षात येत आहे. कारण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘आमची मुंबई’ हे शब्द ट्विटरवर टेड केल्यावरही भाजपच्या राम कदम यांच्यासारख्या आमदारांनी कंगनाचे समर्थन करून तिला थेट ‘झाशीच्या राणी’ची उपमा दिली. तिची बाजू वारंवार लावूनही धरली. मात्र, या सगळय़ा प्रकारानंतर मुंबईसंदर्भात भाजपविरोधातही जनमत जाऊ लागले आहे हे लक्षात आल्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली व कंगनाच्या वक्तव्याशी भाजप सहमत नसल्याचे जाहीर केले. यातूनच लक्षात येत गेले की शिवसेनेबरोबर भाजपलाही कंगनाच्या वादाचा फायदा मुंबईच्या राजकारणासाठी उचलायचा आहे. कंगना प्रकरण वाढत गेल्यानंतर या प्रकरणी महाराष्ट्र भाजप सावध होण्याला अजून एक कारण ठरले, ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे सत्तेतील भागीदार असल्याने अर्थातच हे पक्ष सेनेच्या मागे उभे राहिले. मात्र, महाराष्ट्र भाजपने कंगनाचे समर्थन केले पण कंगनाच्या ‘पाकव्याप्त काश्मीर’च्या टीकेनंतर महाराष्ट्र भाजपा बॅकफूटवर गेली. या सगळय़ानंतर या प्रकरणी महाराष्ट्र भाजपा सावध भूमिका घेत असली, तरी भाजपाच्या महाराष्ट्राबाहेरील नेत्यांनी संजय राऊत यांची प्रतिमा व्हिलन बनवून ते कंगनाचे वारंवार समर्थन करताना दिसत आहेत. यातून भाजपची प्रतिमा मुंबईबाबत नकारात्मक बनते आहे. अर्थात भाजपाची अशी प्रतिमा बनविण्याचा फायदा शेवटी शिवसेनेलाच होणार आहे. कारण आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. खरेतर ही महानगरपालिका कायमच शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे. यात शिवसेनेचा मराठी अस्मितेचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे कंगना प्रकरणात शिवसेना जेवढी आक्रमक होईल, तेवढी होत राहणार आहे. याचीच धास्ती भाजपला लागली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर आहेच, टाळेबंदीतून लोक उपाशी मरत आहेत अशावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. लोकांचे लक्ष या सगळय़ा प्रकरणांपासून विचलित करण्यासाठी कंगना प्रकरण आणि मुंबई हे शिवसेनेसाठी आयतेच कोलित आहे. तरीही या प्रकरणाच्या निमित्ताने कंगनाच्या कार्यालयाचा बेकायदा भाग ज्या तातडीने मुंबई महापालिकेने तोडला, याचे जसे समर्थन करता येणार नाही, तसेच कंगना मुंबईत आल्यानंतर तिने ज्या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला, त्याचेही समर्थन करता येणार नाही!
Previous Articleसोने-चांदी दरात पुन्हा घसरण
Next Article घरपट्टी भरण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडून नोटीस
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








