दोन महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू : रानबांबुळी येथे घडली घटना
प्रतिनिधी / ओरोस:
औषध समजून नजरचुकीने आईकडून कीटकनाशक भरविले गेल्याने रानबांबुळी गावडेवाडी येथील समृद्धी सचिन गावडे या दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सचिन गावडे, त्यांची पत्नी आणि दोन मुली तसेच भाऊ, वहिनी व आई-वडील असे कुटुंबीय रानबांबुळी येथे राहतात. दोन महिन्यांपूर्वी सचिन यांना तिसरी मुलगी झाली होती. तिचे नाव समृद्धी ठेवण्यात आले होते. 26 जुलै रोजी सायंकाळी ती रडू लागली. तिला सर्दी झाली असल्याने ती रडत असल्याच्या अंदाजाने तिला कपाटाखाली ठेवलेल्या औषधाच्या बाटल्यांमधील एका बाटलीतील औषध भरविण्यात आले. मात्र औषध भरविल्यानंतर तिची तब्येत आणखी बिघडली. त्यामुळे तिला पडवे येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी तिला विषबाधा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदवला असून व्हीसेरा राखून ठेवला आहे. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार ओरोस पोलिसांनी अपघाती विषबाधेने मृत्यू, अशी या घटनेची नोंद केली आहे. दरम्यान बाळ रडू लागल्याने औषधांच्या बाटलीसोबत काजूच्या झाडावर फवारणी करण्यासाठी ठेवलेल्या बाटलीतील औषध चुकून भरविले गेल्याची बाब समोर आली आहे. औsषध म्हणून देण्यात आलेल्या कीटकनाशकाची बाटली पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱयांनीही विषबाधा झाल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र याबाबत नातेवाईकांपैकी कुणाचीही तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. या मृत्यूबाबत कोणाला काही अन्य संशय असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी केले आहे. याबाबतचे जबाब नेंदविण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्वे करीत आहेत.









