प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील ओल्ड ग्रँट बंगल्यांमध्ये झालेल्या अतिक्रमणाची माहिती घेण्यासाठी समिती स्थापन करण्यास कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सर्वेक्षण करण्यास डिफेन्स इस्टेट ऑफिसरकडून (डीईओ) परवानगीची गरज आहे. तसेच सर्वेक्षण करण्यास सदस्यांनी लेखी तक्रार देऊन आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या ओल्ड ग्रँट बंगल्यांचे सर्वेक्षण रखडण्याची शक्मयता दिसू लागली आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरातील बंगल्यांचा विनियोग व्यवसायासाठी केला जात आहे. काही बंगल्यांमध्ये अतिक्रमण झाले आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डकडून वारंवार सूचना देण्यात येते. मात्र, आता अतिक्रमणाची माहिती सादर करण्याचा आदेश संरक्षण खात्यानेच कॅन्टोन्मेंट बोर्डला बजावला आहे. देशातील 62 कॅन्टोन्मेंटमधील ओल्ड ग्रँट बंगल्यांमध्ये झालेल्या अतिक्रमणाची माहिती घेण्यासाठी समिती स्थापन करून अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे समिती स्थापन करण्याच्या मुद्यावर बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्वसाधारण बैठकीत जोरदार चर्चा झाली होती. ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वेक्षणासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण ओल्ड ग्रँड बंगल्यांचे सर्वेक्षण करण्यात येऊ नये, अशी मागणी करून लोकनियुक्त सदस्यांनी आक्षेप नोंदविला होता. तरीदेखील बंगल्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.
मात्र, बैठकीत या विषयाला मंजुरी देऊन समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असला तरी काही सदस्यांनी पुन्हा लेखी तक्रार नोंदविली आहे. सदर सर्वेक्षण थांबविण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे कॅन्टोन्मेंट बोर्डकडे केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अतिक्रमण सर्वेक्षणाची मोहीम कधीपासून सुरू करणार याबाबतची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांच्याकडे विचारणा केली असता, अतिक्रमण सर्वेक्षण मोहिमेत डिफेन्स इस्टेट ऑफिसची अडचण असल्याचे सांगितले. ओल्ड ग्रँट बंगल्यांच्या बांधकामाची परवानगी आणि त्याबाबतची सविस्तर माहिती डिफेन्स इस्टेट ऑफिसरकडे असते. कॅन्टोन्मेंटकडे याबाबत अधिक तपशील उपलब्ध नाही, त्यामुळे सर्वेक्षण कोणत्या आधारावर करायचे हा प्रश्न उपस्थित होते. त्याकरिता डिफेन्स इस्टेट ऑफिसरकडून आवश्यक माहिती किंवा परवानगी मिळणे गरजेचे आहे. डिफेन्स इस्टेट ऑफिसरकडून माहिती मिळाल्यानंतरच अतिक्रमणाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्रीबर्चस्वा यांनी दिली.
ओल्ड ग्रँट बंगल्यातील अतिक्रमणाची माहिती घेण्यासाठी डिफेन्स इस्टेट ऑफिसरची संमती आवश्यक आहे. त्यामुळे अतिक्रमणाच्या सर्वेक्षणाची मोहीम रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.









