गोमंतक भंडारी समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / फोंडा
राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसीसाठी राखीव असलेल्या एक हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. ही नोकरभरती त्वरीत करण्याची मागणी गोमंतक भंडारी समाजातर्फे करण्यात आली आहे. समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी त्यासंबंधीचे लेखी निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले आहे.
यावेळी भंडारी समाजाचे डिचोली तालुका प्रमुख आनंद नार्वेकर हे उपस्थित होते. विधानसभेच्या अधिवेशनात ओबीसीसाठी विविध सरकारी खात्यामध्ये 1163 जागा अद्याप भरलेल्या नाही, अशी माहिती सत्ताधारी पक्षानेच दिली होती. शिवाय हल्लीच मुख्यमंत्र्यांनी विविध सरकारी खात्यामध्ये नोकरभरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासंबंधी वृत्तपत्रात जाहिरातीही प्रसिद्ध झालेल्या आहेत. राज्यातील इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या त्यांच्या हक्काच्या या नोकऱया त्वरीत त्यांना खुल्या कराव्यात, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह समाजकल्याणमंत्री, विरोधीपक्ष नेते व भंडारी समाजातील आमदारांना देण्यात आल्या आहेत.









